भाजप धक्का देण्याच्या तयारीत, फोडाफोडी रोखण्यासाठी आमदार जयपुरात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:21 AM2020-06-12T06:21:15+5:302020-06-12T06:23:18+5:30

राजस्थान : आमदार फोडाफोडी रोखण्यासाठी काँग्रेस निरीक्षक जयपूरमध्ये

BJP ready to push, MLA in Jaipur to stop looting | भाजप धक्का देण्याच्या तयारीत, फोडाफोडी रोखण्यासाठी आमदार जयपुरात

भाजप धक्का देण्याच्या तयारीत, फोडाफोडी रोखण्यासाठी आमदार जयपुरात

Next

नवी दिल्ली/जयपूर : मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थानातील काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप नेते करीत असल्याच्या वृत्तामुळे काँग्रेसने आपल्या १०७ आणि १२ अपक्ष आमदारांना जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवले आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांना ताबडतोब जयपूरला पाठवले.

ज्या पद्धतीने कमलनाथ सरकार पाडले, त्याच प्रकारे गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यासाठी काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना कोट्यवधी रुपयांची लालूच दाखविण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी केला. तशी तक्रार काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही केली आहे. राजस्थान विधानसभेतून राज्यसभेवर तीन जणांना निवडून पाठवायचे असून, ती निवडणूक १९ जून रोजी होणार आहे. संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचे दोन आणि भाजपचा १ उमेदवार निवडून येऊ शकतो; पण भाजपने दोन उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे आमचे व अपक्ष आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मध्यप्रदेशात ज्या प्रकारे ज्योतिरादित्य सिंदिया यांना फोडले, तसे राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना फोडले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. ते फुटले, तर त्यांच्याबरोबर बरेच आमदार बाहेर पडतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या सर्व आमदारांना बुधवारी रात्री शिव विलास रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. अशोक गेहलोत, वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनी आज या व अपक्ष आमदारांशी चर्चा केली. या बैठकीला सचिन पायलट हेही हजर होते.
आम्ही कोणत्याही स्थितीत काँग्रेसमधून बाहेर पडणार नाही, भाजपमध्ये जाणार नाही वा भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, असे आश्वासन या आमदारांनी नेत्यांना दिले. तरीही मध्यप्रदेशपासून धडा घेऊन येथील नेते अधिक सतर्क झाले आहेत.
कमलनाथ कायम केंद्रीय राजकारणात होते. त्यांना मध्यप्रदेशच्या राजकारणाचा अनुभव नव्हता. त्याचा फटका त्यांना बसला. शिवाय सिंदिया यांच्याबरोबर जे आमदार गेले, त्यांची तिथे जी फरपट झाली, ती पाहून राजस्थानातील एकही आमदार भाजपकडे जाणार नाही, तसेच गेहलोत यांना राज्याचे राजकारण नीट ठाऊक आहे. ते भाजपला पुरून उरतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.
असे असले तरी काँग्रेस नेते सर्व शक्यता लक्षात घेऊन अधिक दक्ष असल्याचे दिसत आहेत. सचिन पायलट यांच्याशी हे नेते सतत संपर्कात आहेत, असे सांगण्यात आले.

गुजरातचे आमदारही जयपुरात
भाजपने गुजरातमधील तीन आमदार गेल्या आठवड्यात फोडले. त्या तिघांनी आमदारकीचे राजीनामे दिले. त्यामुळे गुजरातच्या सर्व काँग्रेस आमदारांना याच रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. गुजरातमध्येही
१९ जूनलाच राज्यसभा निवडणूक आहे. तिथे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

आरोप खोटे : भाजप
काँग्रेसचे राजस्थानातील आमदार फोडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, हा आरोप खोटा असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्या पक्षाला स्वत:चे आमदार टिकवून ठेवता येत नाहीत. त्या पक्षामध्ये नाराजी आहे. त्यास आम्ही जबाबदार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

Web Title: BJP ready to push, MLA in Jaipur to stop looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.