बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:33 IST2025-10-07T13:32:41+5:302025-10-07T13:33:17+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता जागा वाटपावरून राजकारण वेग घेताना पाहायला मिळत आहे.

बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. ६ नोव्हेंबर २०२५ आणि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान होईल. तर १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. यातच आता चिराग पासवान यांचा पक्ष प्रशांत किशोर यांच्यासोबत युती करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. असे झाल्यास भाजपासह एनडीएसाठी अडचणी वाढू शकतात, असे म्हटले जात आहे.
महाआघाडी सत्तेवर कब्जा मिळवण्यासाठी जोमाने मोहिमा राबवत आहे. त्यांचे ज्येष्ठ नेते यासाठी प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांसह भाजपाने आधीच आक्रमक मोहीम सुरू केली आहे. भाजपा सुमारे १०० ते १०२ जागांवर, तर जदयू १०० हून अधिक जागांवर लढणार असल्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे. छोट्या मित्रपक्षांकडून मात्र अधिक जागांची मागणी करण्यात येत आहे. काही नव्या नावांवरही चर्चा सुरू आहे.
चिराग पासवान यांचा पक्ष ४० ते ४५ जागा मागत आहेत. पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या जागेची आवश्यकता नाही. चिराग पासवान शहाबाद भागातील एका जागेवरून निवडणूक लढवू शकतात. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाशी युती करण्याच्या प्रश्नाबाबत, एलजेपी (आर) सूत्रांचे म्हणणे आहे की, कोणाशीही युती करण्याचा पर्याय राजकारणात नेहमीच उपलब्ध असतात. कुणासाठीही पक्षाची दारे खुली आहेत. एनडीएतील कोण किती जागांवर लढणार हे निश्चित झालेले नाही. आम्ही भाजपाकडे जागा मागत आहोत, जदयूकडे नाही, असेही चिराग पासवान यांच्या पक्षाने म्हटले आहे.
दरम्यान, चिराग पासवान या तरुण नेत्याच्या पार्टीची दखल घेण्याइतपत बिहारमधील राजकारण बदलले आहे. २०२०च्या विधानसभा निवडणुकाच चिराग यांच्या पक्षाने एनडीएत सामील न होता १३५ विधानसभा जागा लढल्या होत्या. त्यात त्यांना केवळ एक जागा मिळाली होती, पण चिराग यांनी जदयूची मते मोठ्या प्रमाणात खाल्ली होती.