भाजपा आमदार आपल्याच पार्टीच्या खासदाराविरोधात 101 तासांचा धरणार उपवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 17:51 IST2021-01-27T17:51:03+5:302021-01-27T17:51:51+5:30
surendra singh : सुरेंद्र सिंह यांनी विरेंद्र सिंह मस्त यांच्यावर भूमाफिया असल्याचा आरोप केला आहे.

भाजपा आमदार आपल्याच पार्टीच्या खासदाराविरोधात 101 तासांचा धरणार उपवास
लखनऊ : उत्तर प्रदेशातील भाजपाआमदार सुरेंद्र सिंह हे आपल्याच पार्टीचे खासदार विरेंद्र सिंह मस्त यांच्याविरोधात उपोषण करणार आहेत. सुरेंद्र सिंह यांनी विरेंद्र सिंह मस्त यांच्यावर भूमाफिया असल्याचा आरोप केला आहे. तसेच, विरेंद्र सिंह मस्त आणि बालियाचे जिल्हाधिकारी यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी सुरेंद्र सिंह हे 101 तासांचा उपवास धरणार आहेत.
बालियामधील बैरियामधील आमदार सुरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपा खासदार विरेंद्र सिंह मस्त यांच्यावर निशाणा साधला आहे. विरेंद्र सिंह मस्त हे भूमाफिया असल्याचा आरोप सुरेंद्र सिंह यांनी केला. तसेच, सुरेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी एच.पी. सिंह यांच्यावर खासदारांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप केला आहे.
याचबरोबर खासदार विरेंद्र सिंह मस्त यांनी त्यांचा मुलगा, भाऊ आणि भाच्याच्या नावावर बैरियामध्ये शिवपूर गावातील विजय बहादूर सिंह यांची 18 एकर जमीन फसवणूक करुन ताब्यात घेतली आहे, असा आरोपही केला आहे. तसेच, सुरेंद्र सिंह यांनी उपवासाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे म्हटले. ते खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळण्यासाठी 101 तासांचा उपवास करणार आहेत.
दरम्यान, खासदार विरेंद्र सिंह मस्त यांनी आमदार सुरेंद्र सिंह यांच्याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. उत्तर प्रदेशात सर्वात शक्तीशाली खासदार म्हणून माझी ओळख आहे. मी शांत आहे, याला माझी कमजोरी समजू नका, असे म्हणत विरेंद्र सिंह मस्त यांनी सुरेंद्र सिंह यांना नाव न घेता ठणकावले आहे. "समाजात द्वेष पसरवून कोणी समाजाचे भलं करु शकत नाही. मी बोलत नाही याचा अर्थ मी कमजोर किंवा घाबरतो आहे, असे समजू नका, असा इशारा विरेंद्र सिंह मस्त यांनी दिला आहे.
सुरेंद्र सिंह यांच्या आरोपावर खासदार विरेंद्र सिंह मस्त यांचे खासगी सचिव अमन सिंह यांनीही भाजपा आमदारांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा दावा केला आहे. माध्यमांसमोर आरोप करण्यापेक्षा आमदारांनी कायदेशीर लढाई लढावी, असे आवाहन अमन सिंह यांनी केले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.