BJP MLA On Rahul Gandhi: "राहुल गांधींना संसदेत कोंडून मारायला हवं", भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 17:37 IST2024-07-09T17:35:10+5:302024-07-09T17:37:02+5:30
"विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत कोंडून मारायला हवे. असे केल्यास सात ते आठ एफआयआर दाखल होतील. जर विरोधीपक्षनेते राहुल गांधी मेंगळुरू शहरात आले, तर आम्हीही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू."

BJP MLA On Rahul Gandhi: "राहुल गांधींना संसदेत कोंडून मारायला हवं", भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान
नुकतेच संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्मासंदर्भात वक्तव्य केले होते. यामुळे चांगलाच गदारोळही झाला होता. आता त्यांच्या वक्तव्यावर कर्नाटक भाजपचे आमदार भरत शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधींना संसदेत बंद करून मारायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.
बिझनेस टुडेच्या एका वृत्तानुसार, या मुद्द्यावर बोलताना मेंगळुरू नॉर्थचे आमदार भरत शेट्टी म्हणाले, "विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत कोंडून मारायला हवे. असे केल्यास सात ते आठ एफआयआर दाखल होतील. जर विरोधीपक्षनेते राहुल गांधी मेंगळुरू शहरात आले, तर आम्हीही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू."
"भगवान शिव शंकरांनी तिसरा डोळा उघडला तर..." -
राहुल गांधींवर आरोप करताना भाजपचे आमदार म्हणाले, "वेड्या माहीत नाही की, भगवान शिव शंकरांनी तिसरा डोळा उघडला तर तो (LOP) राख होऊन जाईल. त्याने हिंदुविरोधी धोरण स्वीकारले आहे. LOP राहुल गांधी वेडे आहेत, हे स्पष्ट आहे. त्याला वाटते की, तो हिंदूंसंदर्भात काहीही बोलला, तरी हिंदू गप्पपणे सहन करतील. जर तो संसदेत काही बोलला, तर स्थानिक नेते येथे आपली शेपटी हलवायला सुरू करतील."
"हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच भाजपचे कर्तव्य" -
भरत शेट्टी म्हणाले, हिंदू धर्माचे आणि संस्थांचे रक्षण करणे हे भाजपचे कर्तव्य आहे. काँग्रेसने हिंदू आणि हिंदुत्व वेगवेगळे आहे, असा संदेश द्यायला सुरुवात केली आहे. अशा नेत्यांपासून भविष्यात हिंदुंना धोका आहे.” एवढेच नाही, तर राहुल गांधी ज्या भागाचा दौरा करतात, त्यानुसार आपली भूमिका बदलतात. ते जेव्हा गुजरातला जातात, तेव्हा भगवान शिव शंकरांचे निस्सीम भक्त बनतात," असेही शेट्टी म्हणाले.