JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:55 IST2025-11-21T13:54:43+5:302025-11-21T13:55:23+5:30
Uttar Pradesh BJP News: उत्तर प्रदेशमधील श्रावस्तीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपाने आयोजित केलेल्या युनिटी मार्च पदयात्रेदरम्यान एक दुर्घटना घडली. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह काही नेते जेसीबीवर स्वार होऊन या पदयात्रेत सहभागी झाले होते.

JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते
उत्तर प्रदेशमधील श्रावस्तीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपाने आयोजित केलेल्या युनिटी मार्च पदयात्रेदरम्यान एक दुर्घटना घडली. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह काही नेते जेसीबीवर स्वार होऊन या पदयात्रेत सहभागी झाले होते. त्याचदरम्यान, अचानक असं काही घडलं की भाजपाचे हे नेते धपकन रस्त्यावर पडले. तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी या या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला होता. आता बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या पदयात्रेची सुरुवात इकौना येथील जगजीत सिंह इंटर कॉलेज येथून झाली होती. ढोल-ताशांचा आवाज, घोषणा यामुळे परिसर दुमदुमून गेला होता. ही पययात्रा हळुहळू पुडे जात होती. त्यात जेसीबी सर्वात पुढे होता. त्यावर भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह काही कार्यकर्ते स्वार झाले होते. त्यांच्या हातात तिरंगा होता. कार्यकर्त्यांकडून जोषात घोषणा दिल्या जात होत्या. भाजपाचे जिल्हाध्यक्षही व्यवस्थित तिरंगा हवेत फिरवून उपस्थितांचा उत्साह वाढवत होते. तर काही जण याचं मोबाईललवर चित्रिकरण करत होते.
याचदरम्यान, पदयात्रा एका वळणावर आली असताना जेसीबी चालकाने मशीनचा पुढचा भाग थोडा खाली केला. मात्र या किंचित बदलामुळे समोर उभ्या असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांसह सर्वजण धडाधड खाली पडले. मात्र तिथे असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना पकडले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. मात्र हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्याने आता तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.