भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:57 IST2026-01-13T19:57:15+5:302026-01-13T19:57:41+5:30
सोमवारी दिल्ली भाजपा मुख्यालयात भाजपा आणि चीनची कम्युनिस्ट पार्टी शिष्टमंडळात बैठक झाली

भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली - चीन कम्युनिस्ट पार्टीच्या(CPC) शिष्टमंडळाने भाजपा नेत्यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो पोस्ट करत काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपा मुख्यालयात भाजपा नेते आणि CPC नेत्यांमध्ये ही बैठक झाली. भाजपा आणि चीनमध्ये काय गुप्त करार झाला, या नात्याला काय म्हणायचे? भाजपाने देशद्रोह का केला अशा प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसच्या सोशल मिडिया अकाऊंटवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग सांगतात की, शक्सगाम खोरे हा चीनचा भाग आहे, त्याठिकाणी बांधकाम करणे हे चुकीचे नाही असं त्यांनी म्हटलं. शक्मगाम खोरे हे जम्मू काश्मीरात येते. यावरून काँग्रेसने मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. जम्मू काश्मीरातील शक्सगाम खोरे यावर चीन दावा करत आहे मात्र मोदी त्यांना डोळे वटारून का बघत नाही असंही काँग्रेसने विचारले आहे.
नेमकं काय झालं?
सोमवारी दिल्ली भाजपा मुख्यालयात भाजपा आणि चीनची कम्युनिस्ट पार्टी शिष्टमंडळात बैठक झाली. CPC शिष्टमंडळाचे नेतृत्व सुन हेयान यांनी केले. सुन कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे इंटरनॅशनल डिपार्टमेंटमध्ये वाइस मिनिस्टर आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी केले. भाजपाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाला यांनीही एक्स-पोस्टमध्ये लिहिले आहे की दोन्ही पक्षांनी आंतर-पक्षीय संवाद वाढविण्यावर चर्चा केली त्यावरून आता वादंग निर्माण झाले आहे.
ज्या दिवशी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीसी) शिष्टमंडळाची आणि भाजपा नेत्यांची भेट झाली त्याच दिवशी चीनने जम्मू आणि काश्मीरमधील शक्सगाम व्हॅली परिसर आपला असल्याचा दावा केला. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) या भागातून जाणारा पाकिस्तानला जाणारा रस्ता बांधत आहे. भारताने याला तीव्र आक्षेप घेतला आहे. भारत या भागात कोणत्याही परदेशी बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात आहे. ९ जानेवारी रोजी भारतानेही या भागातील चीनच्या नियंत्रणाला बेकायदेशीर कब्जा असल्याचे वर्णन केले मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा चीनचा भाग असल्याचे म्हटलं.