भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:19 IST2025-12-03T09:18:25+5:302025-12-03T09:19:12+5:30
मुन्नार पंचायत निवडणुकीत भाजपाने नल्लाथन्नी वार्डातून ३४ वर्षीय सोनिया गांधी यांना तिकीट दिले आहे

भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
केरळ पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने तिकिट दिलेल्या एका महिला उमेदवाराच्या नावाची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या महिलेचे नाव सोनिया गांधी आहे आणि भाजपाने या महिलेला उमेदवारी देत काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. इतकेच नाही तर या महिलेचे काँग्रेस कनेक्शनही समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्यसभा खासदार सोनिया गांधी या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत.
माहितीनुसार, मुन्नार पंचायत निवडणुकीत भाजपाने नल्लाथन्नी वार्डातून ३४ वर्षीय सोनिया गांधी यांना तिकीट दिले आहे. त्यांचा जन्म स्थानिक काँग्रेस नेते दुरे राज यांच्या घरी झाला होता. राज आता या जगात नाहीत. परंतु लग्नानंतर परिस्थिती बदलली कारण उमेदवार सोनिया गांधी यांचं लग्न भाजपा नेत्यासोबत झाले. त्यांचे पती सुभाष भाजपाचे पंचायत महासचिव आहेत आणि त्यांनी ओल्ड मुन्नार मुलक्कडमधून पोटनिवडणूकही लढवली होती. लग्नानंतर काही दिवसांनी सोनिया गांधी यादेखील भाजपात सक्रीय झाल्या. हा त्यांचा पहिलाच निवडणुकीचा सामना आहे. त्या काँग्रेस उमेदवार मंजुला रमेश आणि सीपीआयएम नेते वालरमती यांना टक्कर देणार आहेत.
९० वर्षाचे वृद्ध उमेदवार
कोच्चीच्या असमन्नूर गावातील पंचायत निवडणुकीत उमेदवारांमध्ये ९० वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. नारायणन नायर हे वृद्ध उमेदवार अपक्ष रिंगणात उतरले आहेत. हे वृद्ध उमेदवार हातात काळी बॅग घेऊन हळूहळू चालताना दिसतात. घरोघरी जात ते लोकांकडे मत मागत आहेत. नारायणन नायर डिसेंबरमध्ये होणाऱ्या स्थानिक पंचायत निवडणुकीसाठी असमन्नूर गावात उमेदवार म्हणून उभे आहेत. केरळमध्ये स्थानिक निवडणुका २ टप्प्यात ९ आणि ११ डिसेंबरला होणार आहेत. ज्याचे निकाल १३ डिसेंबरला घोषित होतील. त्यात ९४१ ग्रामपंचायत, १५२ ब्लॉक पंचायत, १४ जिल्हा परिषद, ८७ नगरपालिका आणि ६ महापालिकांचा समावेश आहे.