पक्षाच्याच निर्णयांवर टीका, भाजप प्रवक्त्याची हकालपट्टी; मलिक, धनखड यांच्याबाबत पक्षाचा निर्णय अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 09:25 IST2025-08-10T09:24:45+5:302025-08-10T09:25:30+5:30
भाजपने पक्षाचे प्रवक्ते कृष्ण कुमार जानू यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे

पक्षाच्याच निर्णयांवर टीका, भाजप प्रवक्त्याची हकालपट्टी; मलिक, धनखड यांच्याबाबत पक्षाचा निर्णय अमान्य
जयपूर : भाजपने पक्षाचे प्रवक्ते कृष्ण कुमार जानू यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबत पक्षाने केलेल्या वर्तनावर त्यांनी सार्वजनिकरीत्या टीका केली होती, यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
जानू यांच्या हकालपट्टीमुळे भाजपच्या शिस्त आणि नेतृत्वावर टीका करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
व्हिडीओमुळे झाला वाद
वरिष्ठ भाजप नेत्यांवर टीका : जानू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात त्यांनी वरिष्ठ भाजप नेत्यांवर टीका केली होती.
जाट समाजातील नेत्यांचा अपमान : जानू यांनी म्हटले होते की, सत्यपाल मलिक आणि जगदीप धनखड हे दोन्ही जाट समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांचा अपमान योग्य नाही.
शिस्तभंगाची कारवाई : भाजपने जानू यांना २० जून रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.