'भाजपला पैसा जमा करण्याची कला अवगत, विरोधकांच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या कलांतही प्रावीण्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 07:30 AM2021-12-27T07:30:18+5:302021-12-27T07:30:39+5:30

'भाजप सत्तेत नसताना ‘शेठजीं’चा पक्ष अशी राजकारणात ओळख होती, शिवसेनेच्या मैत्रीनंतर ती पुसली गेली' 

BJP is aware of the art of raising money shiv sena saamna editorial slams bjp party donation collection | 'भाजपला पैसा जमा करण्याची कला अवगत, विरोधकांच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या कलांतही प्रावीण्य'

'भाजपला पैसा जमा करण्याची कला अवगत, विरोधकांच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या कलांतही प्रावीण्य'

Next

देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले. कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे, स्वातंत्र्यवीर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढ्य होत जाईल, पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.
यामुळे देश आणखी बलाढ्य खरंच होईल? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही!, असं शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपच्या देणगी मोहिमेवर निशाणा साधला.

काय म्हटलेय अग्रलेखात?
भारतीय जनता पक्षाने जनतेकडे देणगीसाठी आवाहन केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून देणगी हे अभियान सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा वगैरेंनी पक्षाला प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी देऊन पैसे दिल्याची पावती सोशल मीडियावर झळकवली आहे. मोदी-शहांनी देणगीची पावती समाज माध्यमांवर फडकवताच पक्षाचे इतर नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी वगैरे बडय़ा मंडळींनीही पक्षनिधीच्या पावत्या फाडल्या. पक्षासाठी अथवा राजकीय कार्यासाठी देणग्या घेणे यात अजिबात गैर नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक चळवळींत लोकांच्या देणग्यांचेच पाठबळ मिळत राहिले, पण इतर सर्व आणि भाजपमध्ये फरक आहे.

देगण्या गोळा करुन चूल पेटवण्याची वेळ आली नाही
 भाजपवर देणग्या गोळा करून चूल पेटविण्याची वेळ अद्याप तरी आलेली नाही. भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष असावा. भाजप हा सत्तेत नव्हता तेव्हा ‘शेठजीं’चा पक्ष अशीच त्याची ओळख राजकारणात होती. ही ओळख शिवसेनेशी मैत्री झाल्यावर पुसली गेली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती झाल्यावर, अयोध्या आंदोलनाने जोर धरल्यावर भाजप लोकांपर्यंत पोहोचला. भाजप त्याआधी काय होता हे काय कुणाला माहीत नाही? ते काही असले तरी भाजपचे नाव श्रीमंतांच्या यादीत झळकले, याचे कुणाला दुःख होण्याचे कारण नाही.

भाजपला पैसा जमा करण्याची कला अवगत
भारतीय जनता पक्षाने आता लोकांकडून पाच रुपयांपासून, 50, 100, 500 व एक हजार रुपयांपर्यंत देणग्या घेण्याचे मायाजाल टाकले आहे. म्हणजे आपला पक्ष लोक वर्गणीवर उभा आहे हे त्यांना दाखवायचे आहे, पण भाजपने 2019-20 सालात 3,623.28 कोटी रुपयांची ‘संपत्ती’ जाहीर केली आहे. भाजपचा जमाखर्च, नफा-तोटा खाते आता सगळ्यांसमोर आहे. तसे इतर पक्षांचेही आहे. 2014 पासून कोणाची बँक खाती कशी तरारून फुगली हे काही लपून राहिलेले नाही. कधी काळी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हीच बरकत होती. भारतीय जनता पक्षाला पैसा जमा करण्याची कला अवगत आहे. तशी राजकीय विरोधकांच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या कलांतही त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे.

बड्या देणगीदारांना सुरक्षित केलं
नोटाबंदी काळात त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेच होते, स्वपक्षाच्या बडय़ा देणगीदारांना आधीच नोटाबंदीची माहिती देऊन त्यांना सुरक्षित केले, पण विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच त्यांचा उदात्त हेतू होता. विरोधी पक्षांच्या हाती निवडणुका लढण्यासाठी फार साधने राहू नयेत व त्यांच्यावर भिकेची वेळ यावी अशी तरतूद गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, तेलगू देसम, शिवसेना, काँग्रेस या पक्षांच्या देणगीदारांना या ना त्या मार्गाने त्रास द्यायचा व फक्त भाजपला पैसे द्या, इतरांना द्याल तर याद राखा अशा गुप्त मोहिमा राबविण्यात आल्याचे खुलेपणाने बोलले जात आहे. त्यामुळे ‘भाजप’ हा अल्पावधीत अतिश्रीमंत पक्ष झाला व त्यांचा थाट-माट-तोरा वाढला याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. 

श्रीमंतीचे टोक उंचावर
भाजपच्या श्रीमंतीचे टोक किती उंचावर गेले आहे ते अयोध्येत भाजप परिवारांतील प्रमुख लोकांनी केलेल्या जमीन खरेदीवरून काल दिसले. ही अशी श्रीमंती ओसंडून वाहत असताना विशेष देणगी मोहीम राबविण्याचे प्रयोजन काय? याचेही उत्तर श्री. मोदी यांनी देऊन टाकले आहे. “देशास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या व आजन्म देशसेवा करणाऱ्या आमच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संस्कृतीला या मोहिमेमुळे अधिक बळ मिळेल. तुमच्या मदतीमुळे भाजप व आपला देश आणखी बलाढ्य होईल.’’ अशी चिंता मोदी यांनी करावी हे आश्चर्यच आहे. देशात लॉक डाऊन पुन्हा येत आहे. देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले. 

Web Title: BJP is aware of the art of raising money shiv sena saamna editorial slams bjp party donation collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.