अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:30 IST2025-10-02T14:28:03+5:302025-10-02T14:30:07+5:30
गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूमध्ये एनडीए मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
तामिळनाडूच्या करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ४१ लोकांचा जीव गेला. या घटनेनंतर आता केंद्र सरकार अभिनेता विजयच्या सुरक्षेत वाढ करण्याचा विचार करत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीनेही हा विचार केला जात आहे.
भाजपाच्या सूत्रांनुसार, अभिनेत्यापासून राजकीय नेता बनलेल्या विजयच्या सुरक्षेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इतर केंद्रीय पोलीस कर्मचार्यांची संख्या दुप्पट करण्याचा विचार करत आहे. तामिळनाडूत वाढणऱ्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले जाईल. अलीकडच्या घटनाक्रमानंतर द्रविड मुनेत्र कझगम (डीएमके) आणि त्यांच्या सहकारी पक्षाच्या दीर्घ प्रभावशील राज्यात अभिनेता विजय प्रमुख चेहरा म्हणून पुढे आला आहे. डीएमकेच्या मजबूत आघाडीला हरवण्यासाठी आणखी एक मजबूत विरोधी मोर्चाची गरज भाजपाला वाटते. लोकसभा निवडणुकीपूर्वी एआयडीएमकेला एनडीएमध्ये घेण्यामागे हाच तर्क होता. गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूमध्ये एनडीए मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
सर्व्हेतून काय माहिती मिळाली?
नुकत्याच एका सर्व्हेत डीएमके आघाडी अद्यापही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे भाजपा आणि एआयडीएमके यांच्या युतीला एकट्याच्या बळावर नेतृत्व बदलणं शक्य नाही. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते विजय यांना एनडीएत सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विजय याच्या टीवीके पक्षाची व्यापक लोकप्रियता आणि डीएमकेविरोधी भूमिका हेदेखील प्रमुख कारण आहे. परंतु विजय याच्या पक्षाला एनडीएत सामावून घेण्याची प्रक्रिया इतकी सोपी नाही. डीएमकेला विरोध करण्यासोबतच अभिनेता विजय एआयडीएमके आणि भाजपा यांनाही टार्गेट करत आहे. त्यामुळे अमित शाह आणि एआयडीएमकेचे प्रमुख संभ्रमात आहेत.
करूरच्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर राजकीय समीकरण बदलले आहेत. सर्वात आधी टीवीके समर्थकांनी या घटनेसाठी डीएमकेला जबाबदार धरले. त्यानंतर एआयडीएमके आणि भाजपाने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. या घटनेमुळे डीएमकेविरोधात तिन्ही पक्ष एकत्र आल्याचं चित्र आहे. त्यामुळे अभिनेता विजयसोबत चर्चेचा मार्गही खुला झाला आहे. अमित शाह यांनी विजय याच्याशी संपर्कही साधला जे विजयच्या पक्षाला एनडीएच्या बाजूने वळवण्यासाठी एक पाऊल मानले जाते. त्यामुळे येत्या काळात तामिळनाडूच्या राजकारणात आणखी काय चित्र बदलणार हे स्पष्ट होणार आहे.