Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:33 IST2025-12-30T13:33:12+5:302025-12-30T13:33:59+5:30
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकात्यात पत्रकार परिषद घेऊन तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकात्यात पत्रकार परिषद घेऊन तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या १५ वर्षांत बंगाल भीती, भ्रष्टाचार आणि घुसखोरीचा बळी ठरल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. २०२६ मध्ये भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरी संपवणार, घुसखोरांना शोधून बाहेर काढलं जाईल, विकासाला गती दिली जाईल आणि बंगालचा सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित केला जाईल, असा दावा शाह यांनी केला.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "बंगालच्या सीमेवरून होणारी घुसखोरी हा केवळ राज्याचाच नाही, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषय आहे. देशाची संस्कृती आणि सुरक्षा वाचवण्यासाठी बंगालच्या सीमा सील करणारं सरकार आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. हे काम टीएमसी करू शकत नाही, तर केवळ भाजपाच करू शकते."
"गेल्या १५ वर्षांपासून भीती आणि भ्रष्टाचार ही बंगालची ओळख बनली आहे. १५ एप्रिल २०२६ नंतर जेव्हा बंगालमध्ये भाजपाचं सरकार येईल, तेव्हा आम्ही 'बंग गौरव', 'बंग संस्कृती' आणि त्याच्या पुनर्जागरणाची सुरुवात करू. विवेकानंद, बंकिम बाबू, गुरुदेव टागोर आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नातील बंगाल घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल."
Live from the press conference in Kolkata, West Bengal.
\— Amit Shah (@AmitShah) December 30, 2025
পশ্চিমবঙ্গের কলকাতা থেকে সরাসরি সাংবাদিক সম্মেলন। https://t.co/cpiLQd4IKO
"टीएमसीच्या १५ वर्षांच्या राजवटीत भ्रष्टाचार, कुशासन आणि विशेषतः घुसखोरीमुळे बंगालची जनता भयभीत आणि साशंक आहे. आम्ही बंगालच्या जनतेला आश्वासन आणि वचन देतो की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार येताच येथील वारसा पुनरुज्जीवित करू, विकासाची गंगा पुन्हा वेगाने वाहेल आणि गरीब कल्याणाला आमचं प्राधान्य असेल" असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.
३० डिसेंबरच्या मुहूर्ताचा उल्लेख करत अमित शाह म्हणाले, "आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी १९४३ मध्ये बंगालचे सुपुत्र आणि महान स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवला होता. हा आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. दशकांनंतर आज जेव्हा आपण पाहतो, तेव्हा बंगालसाठी ३० डिसेंबरपासून ते एप्रिलपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे."