राज्यसभा उपसभापती निवडणुकीत किंगमेकरची भूमिका निभावणार BJD ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:38 IST2018-08-06T20:23:16+5:302018-08-06T20:38:38+5:30
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक येत्या 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी 8 ऑगस्ट रोजी 12 वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत.

राज्यसभा उपसभापती निवडणुकीत किंगमेकरची भूमिका निभावणार BJD ?
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक येत्या 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी 8 ऑगस्ट रोजी 12 वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. एनडीएकडून जेडीयूचे हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षाकडून अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव पुढे करण्यात आलेले नाही. दरम्यान, राज्यसभेत एनडीएजवळ 115 जागा आहेत. तर यूपीएकडे 113 जागा आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत बीजू जनता दल किंगमेकरच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे. बीजू जनता दलाकडे 9 जागा आहेत.
राज्यसभेत सध्या 244 सदस्य मतदान करतील अशी स्थिती आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाला जिंकण्यासाठी 123 जागा मिळणे आवश्यक आहे. राज्यसभेत एनडीएकडे 115 जागा आहेत. यामध्ये सर्वाधिक जास्त 73 जागा भारतीय जनता पार्टीकडे आहेत. यूपीएकडे 113 आहेत, यामध्ये काँग्रेसकडे 30 जागा आहेत. इतर पक्षांकडे 16 जागा आहेत. यामध्ये सर्वाधिक 9 जागा या बीजू जनता दलाकडे आहेत.
दरम्यान, या परिस्थितीत बीजू जनता दलाच्या 9 सदस्यांनी एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले, तर (115+9) 124 जागा होतील आणि बहुमताने एनडीएकडे एक जागा जास्त होईल. मात्र, बीजू जनता दलाने यूपीएला समर्थन दिले, तर यूपीएकडे (113+9) 122 जागा होतील. अशातच, यूपीएला बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता भासेल. त्यामुळे यूपीएला बीजू जनता दलासह आणखी कोणत्याही पक्षाचे समर्थन घ्यावे लागणार आहे.
राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ 2 जुलै रोजी संपला होता. तेव्हापासून उपसभापतीपद रिक्त आहे. आता त्यासाठी निवडणूक होत आहे.