जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या नवजात कन्येचा दाबला गळा, बेळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:49 IST2025-11-26T12:47:51+5:302025-11-26T12:49:09+5:30
''बाळ श्वास घेत नाहीये'' असा बनाव रचला

जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या नवजात कन्येचा दाबला गळा, बेळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हिरेमुलंगी गावात मातेने अवघ्या तीन दिवसांच्या नवजात मुलीचा गळा आवळून खून केला आहे. या मातेला यापूर्वी तीन मुली आहेत आणि केवळ मुलगा हवा या आशेवर मुलगी झाल्याच्या कारणामुळेच तिने हे क्रूर कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुलंगी गावातील अश्विनी हळकट्टी (वय २८) हिने हे पाशवी कृत्य केले आहे. या महिलेला यापूर्वी तीन मुली होत्या, त्यामुळे तिला यावेळी मुलगा होण्याची तीव्र अपेक्षा होती. २३ नोव्हेंबर रोजी तिची मुदकवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली होती. प्रसूतीच्या दुसऱ्याच दिवशी अश्विनी माहेरच्या घरी हिरेमुलंगी येथे आली. मंगळवारी सकाळी कुटुंबातील सदस्य बाहेर गेले असताना आई अश्विनीने आपल्या तीन दिवसांच्या नवजात मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर ''बाळ श्वास घेत नाहीये'' असा बनाव रचला.
रामदुर्ग येथील सरकारी रुग्णालयात बाळाला तपासणीसाठी आणले असता ही संपूर्ण घटना उघडकीस आली. डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली असता, "नवजात मुलीचा गळा दाबल्यामुळे आणि श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे," असे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी क्रूर माता अश्विनी हळकट्टी हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नवजात शिशुचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी त्या अश्विनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र तिला अद्याप अटक करण्यात आली नाही.