लाखोंचा खर्च वाया, आनंदाचं रूपांतर दुःखात... इन्स्टावरचा 'तो' मेसेज पाहून नवरदेवाने मोडलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:00 IST2025-11-27T11:59:08+5:302025-11-27T12:00:19+5:30
लग्नाची वरात येण्याच्या फक्त १८ तास आधी नवरदेवाने लग्नाला नकार दिला.

लाखोंचा खर्च वाया, आनंदाचं रूपांतर दुःखात... इन्स्टावरचा 'तो' मेसेज पाहून नवरदेवाने मोडलं लग्न
बिजनौर जिल्ह्यात फेक इन्स्टाग्राम आयडीवरून पाठवलेल्या वादग्रस्त मेसेजमुळे लग्नाचा आनंद दुःखात बदलला. लग्नाची वरात येण्याच्या फक्त १८ तास आधी नवरदेवाने लग्नाला नकार दिला आणि नवरीच्या चारित्र्यावरही गंभीर आरोप केले. धक्कादायक बाब म्हणजे यामुळे निराश झालेल्या नवरीने आत्महत्येचा प्रयत्न केला.
बिजनौरच्या नगीना येथील इब्राहिमपूर गावातील रहिवासी फिरोज आलम दिल्लीत व्यवसाय करतात. त्यांची मुलगी नाजिशचं लग्न नगीना येथील रहिवासी रियाजुद्दीन अन्सारीशी ठरलं होतं. २४ नोव्हेंबर रोजी, रियाजुद्दीन वरात घेऊन येणार होता. पण एक दिवस आधी एका फेक इन्स्टाग्राम आयडीवरून नवरदेवाच्या फोनवर मुलीबद्दल चुकीचा मेसेज पाठवण्यात आला. तसेच वरात घेऊन येऊ नका असं सांगत धमकी देखील देण्यात आली.
मुलीच्या कुटुंबाने आयडी फेक असल्याचं सांगितलं. कोणीतरी लग्नात अडथळा आणण्यासाठी मुलीची बदनामी करत आहे असंही म्हटलं. नवरदेवाच्या कुटुंबाने नवरीवर इतर अनेक आरोप केले, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. नवरीच्या कुटुंबाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि सत्य उघड करण्यासाठी फेक आयडीमागील व्यक्तीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबात गोंधळ उडाला. नवरा-नवरीचे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. लग्नासाठी जेवणाची जय्यत तयारी सुरू होती आणि बँक्वेट हॉल सजवण्यास सुरुवात झाली होती. लग्नावर लाखोंचा खर्च करण्यात आला होता. मात्र नवरदेवाच्या कुटुंबाने लग्न करण्यास नकार दिल्याने हा सर्व आनंद दुःखात बदलला. आरोपांमुळे अस्वस्थ होऊन नवरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.