बिहारचा नवा ‘सम्राट’; ९ वर्षांत प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अन् आता मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:35 IST2026-04-15T07:35:23+5:302026-04-15T07:35:48+5:30
Bihar News: बिहारच्या राजकारणात भाजपचा एक नवा प्रवास सुरू होत आहे. भाजपा विधिमंडळ दलाचे नेते म्हणून निवड झाल्यावर, सम्राट चौधरी बिहारचे पहिले भाजपा मुख्यमंत्री बनत आहेत.

बिहारचा नवा ‘सम्राट’; ९ वर्षांत प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अन् आता मुख्यमंत्री
पाटणा - बिहारच्या राजकारणात भाजपचा एक नवा प्रवास सुरू होत आहे. भाजपा विधिमंडळ दलाचे नेते म्हणून निवड झाल्यावर, सम्राट चौधरी बिहारचे पहिले भाजपा मुख्यमंत्री बनत आहेत.
हिंदी पट्ट्यातील महत्त्वाचे राज्य असूनही आजवर भाजपला बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद मिळवता आले नव्हते, हा दुष्काळ आता संपला आहे. संघाची पार्श्वभूमी नसतानाही केवळ आपल्या वक्तृत्वशैलीच्या आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सम्राट चौधरी यांनी भाजपात आपले स्थान निर्माण केले आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या 'इनिंग'कडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.
राजकीय प्रवास
सम्राट चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात लालू प्रसाद यादव यांच्या राजद (राष्ट्रीय जनता दल) पक्षातून केली. राबडी देवी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. २०१४ मध्ये ते राजद सोडून नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये सामील झाले. आणि २०१७ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. अवघ्या नऊ वर्षांत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे.
२०२२ मध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली होती, तेव्हा सम्राट चौधरी यांनी डोक्यावर पगडी बांधून एक शपथ घेतली होती की. 'नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतरच मी ही पगडी उतरवीन.’
सम्राट चौधरींपुढील आव्हाने
युतीचे संतुलन : नितीश कुमार यांच्या जदयू आणि इतर लहान मित्रपक्षांना सोबत घेऊन जाणे.
राजकीय पाया विस्तारणे : भाजपला स्वतःच्या हिमतीवर भक्कम करणे.
विरोधकांचे आरोप : राजद व काँग्रेसचे मोठे राजकीय आव्हान त्यांच्यापुढे आहे. वाढती गुंडगिरी हा प्रश्न आहे.
शाह यांचा शब्द खरा ठरला!
गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत म्हटले होते की, 'सम्राट चौधरी यांना 'बडा आदमी' बनवले जाईल.' आज मुख्यमंत्री पदाच्या घोषणेसह अमित शाह यांनी दिलेला हा शब्द सत्यात उतरला आहे.