जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 09:24 IST2025-11-17T09:22:48+5:302025-11-17T09:24:33+5:30
भाजपाकडून नितीश कुमार यांच्या नावावर उघडपणे भाष्य केले जात नव्हते. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी केले होते

जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यात सर्वात जास्त जागा जिंकून भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीच्या निकालात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले. त्यात भाजपाला ८९ आणि जेडीयूला ८५ जागा मिळाल्या आहेत. जेडीयूपेक्षा जास्त आमदार आल्याने भाजपा मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बिहारमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यात नितीश कुमार यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळणार असल्याचं पुढे आले आहे.
माहितीनुसार, बिहारच्या नव्या सरकारमध्ये जेडीयूचे १३ मंत्री बनतील आणि मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना मिळेल. त्याशिवाय भाजपाच्या वाट्याला १३, लोकजनशक्ती पार्टी ३, हम १ आणि आरएलएम यांना १ मंत्रिपद दिले जाऊ शकते. बिहारमध्ये एकूण ३६ मंत्री बनू शकतात. त्यातील नव्या सरकारमध्ये ५ मंत्रिपदे रिक्त ठेवली जाऊ शकतात आणि आगामी काळात त्या जागांवर विस्तार केला जाऊ शकतो. भाजपाकडून २ उपमुख्यमंत्री असतील. ६ आमदारांवर एक मंत्रिपद असा फॉर्म्युला सत्तास्थापनेसाठी एनडीएमध्ये ठरल्याचं दिसून येते.
लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनी नितीश कुमारांची भेट घेत तेच पुन्हा मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले होते. त्यानंतर रविवारी पटना येथे राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनीही नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं विधान केले. परंतु भाजपाकडून नितीश कुमार यांच्या नावावर उघडपणे भाष्य केले जात नव्हते. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी केले होते, आमदारांच्या बैठकीत नेता निश्चित होईल असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान, केवळ एकाच परिस्थितीत भाजपा पहिल्यांदा बिहारमध्ये मुख्यमंत्री बनवू शकतात, जेव्हा नितीश कुमार स्वत: त्यासाठी मान्य होतील. त्यामुळे नितीश कुमार यांच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे. जर बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर नितीश कुमार यांच्या पक्षाकडून १ उपमुख्यमंत्री असतील. नितीश कुमार त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून कुठल्या नेत्याला पुढे करतील, ते सरकारमध्ये नंबर २ पोझिशनवर असतील. मात्र याची शक्यता खूप कमी आहे. सध्या नितीश कुमारच बिहारचे १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी दाट शक्यता आहे.
जे शिंदेंना नाही, ते नितीश कुमारांना मिळणार
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एनडीएने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपापेक्षा कमी जागा एकनाथ शिंदे यांना मिळाल्या. त्यानंतर भाजपाने मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना दिले. बिहारमध्येही अशीच शक्यता वर्तवली जात होती. परंतु जे एकनाथ शिंदे यांना मिळाले नाही, नितीश कुमार यांना मिळणार आहे.