सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:16 IST2025-09-17T10:11:31+5:302025-09-17T10:16:21+5:30

सोशल मीडियावर सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१२-१३ या कालावधी बिहारच्या जेडीयू सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली होती

Bihar Modi JDU Government gave 1,000 acres of land in bhagalpur to Adani at a rate of Rs 1 per year on rent; Opposition AAP, Congress attacks | सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?

सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?

बिहारच्या भागलपूर येथे सरकारने अवघ्या १ रूपये प्रतिवर्ष दराने उद्योगपती गौतम अदानी यांना १०५० एकर जमीन दिली आहे असा आरोप आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांकडून या जमिनी सरकारने नुकसान भरपाई देत ताब्यात घेतल्या आता ही जमीन अदानी यांच्या प्रकल्पासाठी भाड्याने देण्यात आली आहे. जी जमीन नापीक सांगितली जात आहे तिथे जवळपास १० लाख झाडे आहेत, ती अदानी यांच्या कंपनीकडून आता कापली जाणार आहेत असा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

सोशल मीडियावर सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. आप खासदार संजय सिंह म्हणाले की, भागलपूर येथे ८०० मेगाव्हॅटचे ३ प्लांट बसवण्यासाठी १ रूपये दरात १ हजार एकर जमीन अदानींना देण्यात आली आहे. याठिकाणी लावणाऱ्या पॉवर प्लांटमधून जी वीज उत्पादित केली जाईल ती पुढील २५ वर्ष ७ रूपये दराने सरकारकडून खरेदी केली जाणार आहे. जनतेला ही वीज ११ रूपये अथवा १२ रूपये दराने मिळेल का हेदेखील माहिती नाही. जनतेच्या खिशातून पैसा कापला जाईल परंतु पंतप्रधान त्यांच्या मित्राला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. मोदी देशाचे पंतप्रधान नसून अदानींचे पंतप्रधान आहेत असा टोला त्यांनी लगावला. 

२०१२-१३ या कालावधी बिहारच्या जेडीयू सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत जमिनी घेतल्या. म्हणजे जनतेच्या पैशातून हा व्यवहार झाला. त्यानंतर आता याच जमिनी १ रूपये दरात अदानी यांना ३० वर्षांसाठी देण्यात आल्या आहेत असंही आम आदमी पक्षाने म्हटलं. कागदावर ही जमीन नापीक असल्याचं खोटे सांगितले. या जमिनीवर १० लाखाहून अधिक झाडे आहेत. तिथे आंब्यासारखी झाडे आहेत. मात्र आता पॉवर प्लांटसाठी १० लाख झाडे कापली जाणार आहेत असा आरोपही आप पक्षाने केला. 

दरम्यान, भाजपाने याआधी एक झाड आईच्या नावे असं अभियान राबवले. आता ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या होत्या, त्याची १ रूपये किंमत लावली. शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून जमिनीची कागदपत्रे बनवून घेतली. त्यानंतर आता ही जमीन अदानींना दिली जाते. नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रासाठी बिहारला लुटत आहेत. बिहारमध्ये सरकारी जमीन हिसकावली जाते. कोळसा काढला जातो. झाडे कापली जातात. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक झाली, त्याआधी पॉवर प्लांटचा प्रकल्प आणि धारावी प्रकल्प गौतम अदानी यांना देण्यात आले. त्याचप्रकारे झारखंड, छत्तीसगडमध्येही अनेक प्रकल्प अदानींना मिळाले असा आरोप काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला. 

Web Title: Bihar Modi JDU Government gave 1,000 acres of land in bhagalpur to Adani at a rate of Rs 1 per year on rent; Opposition AAP, Congress attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.