NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:35 IST2025-10-08T15:34:33+5:302025-10-08T15:35:55+5:30
चिराग पासवान ३५ जागांची मागणी करत आहेत, तर भाजप त्यांना २५ जागा देण्यास तयार असल्याचे म्हटले जात आहे...

NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) जागावाटपावरून धुपफूस सुरू असल्याचे दिसत आहे. घटक पक्ष आपले 'रंग' दाखवताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री तथा एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान यांनी सर्वप्रथम आपली इच्छा व्यक्त केली. आता 'हम' (HAM) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनीही यासंदर्भात स्पष्टच भाष्य केले आहे.
जागावाटपाची ही चर्चा सुरू असतानाच, 'हम'चे संरक्षक मांझी यांनी सोशल मीडियावर राष्ट्रकवी दिनकर यांच्या कवितेच्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे, "हो न्याय अगर तो आधा दो, यदि उसमें भी कोई बाधा हो, तो दे दो केवल १५ ग्राम, रखो अपनी धरती तमाम, HAM वही खुशी से खाएंगें, परिजन पे असी ना उठाएंगे।" या ओळीतून त्यांनी 'हम' पक्षासाठी सन्मानजनक जागांची मागणी केली आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना मांझी म्हणाले, "आमच्या पक्षाला १० वर्षे झाली असूनही अद्याप मान्यता मिळालेली नाही. यामुळे, पक्षाला मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक तेवढ्या जागांची आमची मागणी आहे." किती आणि कोणत्या जागा मिळतील, यावर अद्याप चर्चा झालेली नाही. १० तारखेला यासंदर्भात निर्णय होईल.
याशिवाय, दिल्लीत माध्यमांशी बोलताना जितन राम मांझी म्हणाले, "आम्हाला अपमानित वाटत आहे. आम्हाला मतदार याद्या देण्यात आल्या नाहीत, आम्हाला बैठकांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. आम्ही हा अपमान किती काळ सहन करणार? मी नेहमीच एनडीएला पाठिंबा दिला आहे, यामुळे आम्हालाही अपमानित वाटू नये, याची काळजी घेणे एनडीएचे कर्तव्य आहे." एवढेच नाही तर, १५ जागा लढवाव्यात, अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे. यांपैकी किमान ८-९ जागा मिळतील अशी आशा आहे. जर आम्हाला १५ जागा मिळाल्या नाहीत, तर आम्ही निवडणूकच लढवणार नाही," असेही जितनराम यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, चिराग पासवान यांनीही 'X' वर एक सूचक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले होते, "वडील (रामविलास पासवान) नेहमी म्हणायचे, 'जुर्म करो मत, जुर्म सहो मत। जीना है तो मरना सीखो, कदम-कदम पर लड़ना सीखो'।" चिराग पासवान ३५ जागांची मागणी करत आहेत, तर भाजप त्यांना २५ जागा देण्यास तयार असल्याचे म्हटले जात आहे.