Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:38 IST2025-11-14T13:36:48+5:302025-11-14T13:38:25+5:30
Sanjay Raut on Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने दुपारपर्यंतच्या कलानुसार जोरदार मुसंडी मारत पुन्हा सत्ता मिळवली आहे.

Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
Bihar Election Result 2025 Sanjay Raut: बिहार विधानसभा निवडणुकीबद्दलचे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. निकालाचे विश्लेषण सुरू झाले असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते असे म्हटले आहे. राऊतांनी भाजप आणि निवडणूक आयोगाचा उल्लेख करत गंभीर विधान केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची शुक्रवारी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीपासूनच एनडीएतील प्रमुख पक्षांनी आघाडी घेतलेली दिसली. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजेपर्यंत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. बिहारच्या निवडणूक निकालाबद्दल खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे.
संजय राऊत म्हणाले, 'एकदम महाराष्ट्र पॅटर्न"
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसारखेच असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
"बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते, ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना ५० च्या आत संपवले", असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2025
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!
भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष
मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजपने ९० जागांवर आघाडी घेतली. तर ८१ जागांसह नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एनडीएमध्ये असलेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्ष रामविलास पक्षानेही काँग्रेसपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. चिराग पासवान यांचा पक्ष २१ जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रीय जनता दल २७ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस चार जागांवर आघाडीवर असून, एआयएमआयएम ५ जागांवर आघाडीवर आहे. जीतनराम मांझी याचा हम पक्षानेही चार जागांवर आघाडी घेतली आहे.