बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:08 IST2025-11-14T11:48:05+5:302025-11-14T12:08:36+5:30
बिहारमध्ये एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र मतांची टक्केवारी पाहिली तर बिहारमध्ये सर्वाधिक मते तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला पडल्याचे दिसून येते

बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
पटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. याठिकाणी सुरुवातीच्या कलांपासून भाजपा-जेडीयू एनडीएला आघाडी मिळताना दिसत आहे. त्यात एनडीएने १२२ जागांचा बहुमतांचा आकडा ओलांडून १९० जागांपर्यंत मुसंडी मारली आहे तर विरोधी आरजेडी काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून येते. बिहारमध्ये आरजेडी ३५ जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
बिहारमध्ये सध्याचं चित्र
भाजपा - ८४
जेडीयू - ७६
आरजेडी - ३५
एलजेपी - २२
काँग्रेस - ६
बिहारमध्ये एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र मतांची टक्केवारी पाहिली तर बिहारमध्ये सर्वाधिक मते तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला पडल्याचे दिसून येते. बिहारमध्ये आतापर्यंत २४ लाख ३७ हजार मते आरजेडीला मिळाली आहेत. त्यापाठोपाठ भाजपाला २३ लाख १० हजार मते, जेडीयूला १९ लाख ६२ हजार मते मिळाली आहे. बिहारमध्ये सर्वाधिक मतांची टक्केवारी २३.०२ टक्के आरजेडीला, भाजपाला २१.८२ टक्के तर जेडीयूला १८.५३ टक्के मते मिळाली आहेत. बिहारमध्ये मतमोजणी सुरू असल्याने या आकडेवारीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

'बिग ब्रदर'साठी लढाई
बिहारच्या एकूण २४३ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. त्यात ११.३० च्या सुमारास जेडीयू ७६ आणि भाजपा ८५ जागांवर आघाडीवर आहे. तर आरजेडी ३५ जागा, काँग्रेस ६ जागांवर आघाडीचे असल्याचे दिसून येते. एनडीएमध्ये चिराग पासवान यांच्या एलजेपीला २२ जागांची आघाडी मिळाल्याचे दिसते. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजपाने एनडीए म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र मुख्यमंत्रिपदावरून निवडणुकीच्या प्रचारात सावध भूमिका घेत होते. आता निकालांमध्ये जेडीयू आणि भाजपा यांच्यातच काटे की टक्कर पाहायला मिळते. त्यामुळे एनडीएत बिहारमध्ये मोठा भाऊ कोण याची स्पर्धा जेडीयू आणि भाजपात सुरू झाली आहे.