"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:33 IST2025-11-14T14:32:40+5:302025-11-14T14:33:30+5:30
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते.

"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कौल आता स्पष्ट झाला आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे परंतु नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीएने जबरदस्त आघाडी घेतली आहे. त्यात भारतीय जनता पार्टीला ९१ आणि जेडीयूला ७८ जागांची आघाडी आहे. त्यातच JDU ने त्यांच्या सोशल मिडिया हँडलवरून नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री बनण्याची पोस्ट केली, त्यानंतर काही वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून एनडीएत वाद निर्माण होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते. त्याआधी एका समर्थकाने पटना येथील पक्षाच्या मुख्यालयासमोर एक पोस्टर लावत टायगर अभी जिंदा है असं नितीश कुमारांचा उल्लेख केला होता. विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी नितीश कुमार यांची तब्येत ठीक नाही, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असं वातावरण निर्मिती केली जात होती. परंतु मतदान संपल्यानंतर ज्यारितीने ते सक्रीय झाले आहेत, ते पाहता एनडीएमध्ये वेगळा संदेश गेला आणि आता नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गावर आहेत.

बिहारच्या राजकारणात मागील दोन दशकांपासून 'सुशासन बाबू' अशी ओळख असलेले नितीश कुमार हे कोणत्याही आघाडीचे अविभाज्य घटक राहिले आहेत. त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका आणि वाढत्या वयामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपने या कमकुवतपणाचा फायदा घेऊन बिहारमध्ये आपले स्वतंत्र वर्चस्व स्थापित करण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.बिहारमध्ये एनडीए डबल सेंच्युरीकडे पोहोचली असून १९८ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यात भाजपाची संख्या जेडीयूपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, भाजपने निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून स्पष्टपणे जाहीर न करण्याची खबरदारी घेतली आहे. 'डबल-इंजिन सरकार' या घोषणेवर अधिक भर देऊन भाजपाने भविष्यातील नेतृत्वाचा पर्याय खुला ठेवला आहे. आता निकालांनंतर भाजपा नितीश कुमारांशिवाय सरकार बनवण्याचा किंवा त्यांच्या भूमिकेत मोठा बदल करण्याचा विचार करू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.