उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:28 IST2025-11-14T15:27:56+5:302025-11-14T15:28:34+5:30
Bihar Election Result 2025: मुकेश सहनी यांच्या विकासशील इंसान पार्टी (VIP) चा सूपडा साफ झाला आहे.

उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
Bihar Election Result 2025: आज बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असून, आतापर्यंतच्या निकालांनुसार, राज्यात NDA ने 200 चा ऐतिहासिक आकडा पार केला आहे. तर, महाआघाडीला 40 पेक्षाही कमी जागा मिळताना दिसत आहेत. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या पदरी तर भोपळा पडला आहे. अशातच, उपमुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणाऱ्या मुकेश सहनी यांच्या पक्षाची काय अवस्था झाली, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
VIP चा दारुण पराभव; खातेही उघडले नाही
महाआघाडीतर्फे उपमुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे मुकेश सहनी आणि त्यांची विकासशील इंसान पार्टी (VIP) ला या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत व्हीआयपीला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. यावरुन राजकीय वर्तुळात “मुकेश सहनी को न खुदा मिला… न विसाल-ए-सनम, ना इधर के रहे, ना उधर के हम.” अशी टीका होत आहे.
उपमुख्यमंत्री पदाची अपेक्षा ठेवणाऱ्या पक्षाला एकही जागा न मिळणे, ही सहनी आणि त्यांच्या पक्षासाठी अत्यंत लज्जास्पद बाब ठरली आहे. व्हीआयपीला अपेक्षाही नव्हती की त्यांचा पूर्णत: सूपडा साफ होईल.
2020 मध्ये VIP ची कामगिरी ?
मुकेश सहनी यांनी 2018 मध्ये VIP ची स्थापना केली. त्यानंतर 2020 च्या निवडणुकांमध्ये पक्षाने 4 जागा(बोचाहा, गौरा बौराम, अलिनगर आणि साहेबगंज) जिंकून सर्वांचे लक्ष वेधले होते. एनडीए सरकारमध्ये त्यांना मत्स्यपालन मंत्रिपद मिळाले होते. परंतु 2022 मध्ये सरकार पडल्याने त्यांचे मंत्रीपदही गेले. NDA सोबतच्या मतभेदांनंतर सहनी महाआघाडीत दाखल झाले. तेजस्वी यादवांना ‘छोटा भाऊ’ म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी जोरदार दावा ठोकला. मात्र निकालांनी त्यांचे सर्व दावे फोल ठरले आहेत.