भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:34 IST2025-10-09T06:33:47+5:302025-10-09T06:34:08+5:30
Bihar Election: जातीय जखमा भरून काढून तरुणांना ओढण्याचा प्रयत्न, भाजपकडून यावेळी नव्या आणि लोकप्रिय चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू आहे.

भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षांतर्गत फाटाफुटीवर मलमपट्टी करण्याची मोहीम सुरू केली आहे. आगामी महिन्यात रंगणाऱ्या या चुरशीच्या लढतीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) तणाव कमी करून सामाजिक समीकरणे सुधारण्यावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः शाहाबाद आणि मगध विभागातील जातीय तणाव आणि स्थानिक गटबाजीमुळे भाजपच्या कामगिरीवर परिणाम झाला होता, तिथे नव्या रणनीतीचा आराखडा भाजपकडून तयार केला जात आहे.
भाजपकडून यावेळी नव्या आणि लोकप्रिय चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू आहे. गायिका मैथिली ठाकूर हिला पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तिने नुकतीच पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी विनोद तावडे यांची भेट घेतली. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग हिनेही केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. बिहारच्या तरुण मतदारांमध्ये या दोन्ही कलाकारांचा चांगला प्रभाव असल्याने, त्यांचा राजकीय सहभाग
पक्षाला लाभदायक ठरू शकतो, असे मानले जात आहे.
राजपूत-कुशवाह मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न
भाजपच्या आतल्या समन्वय मोहिमेची पहिली पायरी मागील आठवड्यात दिसून आली. भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी विनोद तावडे व ऋतुराज सिन्हा यांनी भोजपुरी अभिनेता पवन सिंग आणि उपेंद्र कुशवाह यांची दिल्लीत भेट घडवून आणली.
पवन सिंग यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत करकट मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून लढत दिली होती, यामुळे एनडीएला या राजपूत बहुल क्षेत्रात फटका बसला होता.
समाजातील तणाव...
भाजप व जदयू या दोन्ही पक्षांकडून भूमिहार आणि चंद्रवंशी समाजातील तणाव शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१९ मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जहानाबाद मतदारसंघ चंद्रवंशी यांना दिल्याने भूमिहार समुदाय नाराज झाला होता. यावर तोडगा म्हणून एका मतदारसंघात भूमिहार उमेदवाराला संधी देण्याचा विचार सुरू आहे.
नितीश-चिराग यांच्यातील वाद मिटणार?
चिराग पासवान आणि जितनराम मांझी यांच्यात अनुसूचित जातींच्या उपविभाजनाच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला आहे. पोटनिवडणुकांमधील परस्पर आरोप-प्रत्यारोपांनी दोघांतील नाराजी आणखी वाढली आहे.
नितीश-चिराग यांच्यातील २०२० पासून सुरू असलेला दुरावाही अजून पूर्णपणे मिटलेला नाही. मात्र, असे असतानाही भाजप यावेळी गंभीरतेने प्रयत्न करताना दिसत आहे.
बिहारच्या गुंतागुंतीच्या जातीय राजकारणात विरोधकांशी सामना करण्यापूर्वी घरातील मतभेद आणि ताणतणाव दूर करूनच रणांगणात उतरण्याचा पक्षाचा स्पष्ट संदेश आहे.