अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:03 IST2025-10-21T16:02:27+5:302025-10-21T16:03:50+5:30
भाजपा जनतेला महाआघाडीची भीती दाखवून मत मागत आहे. जर आम्हाला मत दिले नाही तर लालू यादव यांचं जंगलराज पुन्हा येईल असं सांगितले जात आहे असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.

अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यात जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या पक्षातील अनेक उमेदवारांना धमकावून, आमिष दाखवून इतकेच नाही तर गृह मंत्री अमित शाह यांच्यासोबत बसवून जेणेकरून ते उमेदवारी अर्ज भरू नयेत अशी खेळी करण्यात आल्याचा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.
प्रशांत किशोर यांनी म्हटलं की, पक्षाच्या ३ उमेदवारांना एक तर उमेदवारी अर्ज भरू दिला नाही किंवा त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी मजबूर करण्यात आले. दानापूर मतदारसंघाचा उल्लेख करत पीके यांनी एक फोटो दाखवला. तिथले बाहुबली गुन्हेगार रीत लाल यादव जेलमध्ये आहे, ज्याचा फायदा भाजपा घेत आहे. यावेळी जनतेकडे जनसुराजसारखा पर्याय होता. आमचे उमेदवार अखिलेश शाह निवडणूक कार्यालयापर्यंत पोहचू शकले नाही. राजदच्या रित लाल यादव यांनी त्यांचे अपहरण केले असं सांगण्यात आले परंतु त्यांचे अपहरण झाले नाही तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बसलेले होते. गृहमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करून त्यांना बसवून ठेवले जेणेकरून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये असा आरोप किशोर यांनी केला.
मागील काही वर्षांत भाजपाने अशी प्रतिमा बनवली आहे निवडणूक कुणीही जिंकू दे, सरकार तेच बनवतात. बिहारमध्ये यावेळी भाजपाने दहशतीचे आणि भ्रम पसरवण्याचे वातावरण केले आहे. भाजपा जनतेला महाआघाडीची भीती दाखवून मत मागत आहे. जर आम्हाला मत दिले नाही तर लालू यादव यांचं जंगलराज पुन्हा येईल असं सांगितले जात आहे. परंतु जे सर्वात जास्त घाबरलेत ते भाजपावाले आहेत असा टोला प्रशांत किशोर यांनी भाजपाला लगावला.
३ उमेदवारांना धमकावून मागे हटण्यास सांगितले
मागील ४-५ दिवसांपासून जनसुराजच्या ३ घोषित उमेदवारांना धमकावून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जात आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून भाजपात भीती निर्माण झाली आहे. आमच्या उमेदवारांना ते घरातच कैद करत आहेत नाहीतर त्यांना धमकावले जात आहे. आमचा पक्ष भाजपा आणि त्यांच्या एनडीएला हरवण्यासाठी मागे हटणार नाही. जितके उमेदवार खरेदी करायचे करा, धमक्या द्यायच्या त्या द्या..परंतु जनसुराज मागे हटणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू आणि १४ नोव्हेंबरला जो निकाल लागेल त्यातून सगळे स्पष्ट होईल असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.