NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 18:58 IST2025-10-12T18:57:48+5:302025-10-12T18:58:16+5:30
NDA Seat Sharing in Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA मध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये अखेर जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप आणि जनता दल (युनायटेड) प्रत्येकी 101-101 जागांवर उमेदवार उभे करतील, तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ला 29 जागा देण्यात आल्या आहेत. तसेच जीतनराम मांझी यांच्या हम (हिंदुस्तानी अवाम मोर्चा) आणि रालोमो (राष्ट्रीय लोकमत पार्टी) यांना प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत.
काही आठवड्यांपासून NDA मध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू होते. चिराग पासवान 35 जागांची मागणी करत होते, पण अखेरीस 29 जागांवर त्यांनी होकार दिला. जीतनराम मांझी यांनी 15 जागांची मागणी केली होती, मात्र शेवटी 6 जागांवर त्यांची सहमती झाली. 11 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप दिल्यानंतर, 12 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अधिकृत घोषणा केली.
हम एनडीए के साथियों ने सौहार्दपूर्ण वातावरण में सीटों का वितरण पूर्ण किया।
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) October 12, 2025
BJP – 101
JDU – 101
LJP (R) – 29
RLM – 06
HAM – 06
एनडीए के सभी दलों के कार्यकर्ता और नेता इसका हर्षपूर्वक स्वागत करते हैं।
बिहार है तैयार,
फिर से एनडीए सरकार।#NDA4Bihar ✌️
भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, “बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA परिवारातील सर्व सदस्यांनी सौहार्दपूर्ण वातावरणात आपसी सहमतीने जागावाटप मान्य केले आहे. सर्व पक्षांचे कार्यकर्तेही उत्साही आहेत. NDA चा आत्मविश्वास उंचावला असून, बिहारच्या विकासासाठी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे.” त्यांच्या मते, NDA च्या चारही पक्षांनी जागांच्या वाटपावर अंतिम सहमती दर्शवली असून सर्वजण ‘बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार आणण्यास कटिबद्ध’ आहेत.
जागावाटपाचे संपूर्ण चित्र
पक्ष | जागा |
---|---|
भारतीय जनता पक्ष (BJP) | 101 |
जनता दल (युनायटेड - JDU) | 101 |
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) | 29 |
राष्ट्रीय लोकमत पार्टी (RLM) | 06 |
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) | 06 |
एकूण | 243 जागा |