बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 05:30 IST2025-10-24T05:27:17+5:302025-10-24T05:30:06+5:30
‘इंडिया’ आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करताच ‘एनडीए’ने केले आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर

बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : महाआघाडीमधील सर्व सहयोगी पक्षांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून स्वीकारले. या घोषणेनंतर भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जोरदार प्रहार करत म्हटले की, बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद रिक्त नाही; नितीश कुमार हेच आमचे नेते आहेत.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सैयद शाहनवाज हुसेन यांनी टोला लगावत म्हटले की, आधी एमवाय (मुस्लीम–यादव) समीकरण असलेली आघाडी आता “मुकेश साहनी-तेजस्वी यादव” समीकरण बनली आहे. महाआघाडीत फूट स्पष्ट दिसत आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, जद(यू)चे वरिष्ठ नेते के. सी. त्यागी, जद(यू)चे प्रवक्ते नीरज कुमार, केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह, लोजपा (रामविलास) प्रमुख चिराग पासवान महाआघाडीच्या निर्णयावर कडाडून टीका केली. तेजस्वींसाठी लालू यांनी मित्रपक्षांवर दबाव आणला, अशी सम्राट चौधरी यांनी टीका केली.
तेजस्वी यादव यांचा आत्मविश्वास वाढला
महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर झाल्यानंतर तेजस्वी यादव यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. त्यांनी सांगितले की, सर्व घटक पक्षांनी माझ्या वर विश्वास दाखवला आहे. मी त्या विश्वासाला पात्र ठरेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सांगतो की, गुजरातमधील फॅक्टरी मॉडेल, बिहारचे व्हिक्टरी मॉडेल यापुढे चालणार नाही. सत्ताधारी सरकारला आम्ही सत्तेतून घालवू.
निरीक्षकाला दिला काँग्रेसने घरचा आहेर
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून बिहारमध्ये पाठवलेले निवडणूक निरीक्षक कृष्णा अलावारू यांना गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष पत्करावा लागला. अलावारू हे कॉर्पोरेट एजंट असून ते आरएसएसचे हस्तक असल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला. अलावारू यांना त्वरित पदावरून हटवावे अशीही मागणी या नेत्यांनी पक्षाच्या मुख्यालयात धरणे धरून केली. ‘तिकीट चोर, बिहार छोड’ अशा घोषणा नेते व कार्यकर्ते जोरजोरात देत होते. त्यांच्या दंडावर काळ्या रिबीनी व हातात निषेधाचे फलक होते.
या गोंधळाबाबत आनंद मदहाब या नेत्याने माध्यमांसमोर कैफियत मांडताना म्हटले, आमचे प्रश्न मांडण्यासाठी पक्षात कोणतीही जागा नाही. अलावारू यांनी बिहार काँग्रेसची वाट लावली आहे. राहुल गांधी यांनी वोट अधिकार यात्रा करून बिहारमध्ये चैतन्य आणले होते. ते चैतन्य या व्यक्तीने धुळीस मिळवले.