बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 14:30 IST2025-11-23T14:28:24+5:302025-11-23T14:30:49+5:30
Prashant Kishor Reaction On Bihar Assembly Election Result 2025: ईव्हीएमबाबत माझ्याकडे पुरावा नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटताना पाहिले नाही. निवडणूक प्रक्रियेत काहीतरी अकल्पनीय घडले, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
Prashant Kishor Reaction On Bihar Assembly Election Result 2025: मोठा गाजावाजा करत बिहार निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेल्या रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या हाती भोपळा मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. बिहार विधानसभा निवडणूक निकालावर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुरुवातीचे काही दिवस यावर काहीच भाष्य न करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी या धक्क्यातून सावरत याबाबत मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालावर पुन्हा एकदा भाष्य केले. प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे की, निवडणूक प्रक्रियेत काहीतरी अकल्पनीय घडले. या निवडणुकीत काहीतरी चुकीचे घडले आहे. मतदानाचा ट्रेंड प्रत्यक्ष प्रतिसादाशी जुळत नव्हता. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांत एनडीएने महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये वाटून मतांवर प्रभाव पाडला, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.
महिलांना अशा प्रकारे पैसे वाटताना पाहिले नाही
प्रशांत किशोर पराभवाची कारणे सांगताना म्हणाले की, पहिला घटक म्हणजे निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदानापूर्वी ५० हजार महिलांना (जीविका दीदी योजना) पैसे पाठवण्यात आले. दुसरा घटक होता लालू प्रसाद आणि जंगल राज परत येण्याची शक्यता. निवडणुकीपूर्वी लोक अंदाज लावत होते की, जनसुराज्य पक्ष १० ते २० टक्के मते मिळवू शकतात. तसेच मतदान करताना जंगल राज परत येईल. यामुळे काही लोक निश्चितच दूर गेले. तसेच निवडणुकीच्या काळात, एनडीएने महिलांना मोठ्या प्रमाणात रक्कम वाटली. निवडणुकीच्या घोषणेपासून मतदानापर्यंत महिलांना दहा हजार रुपये वाटण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की, हा पहिला हप्ता आहे. जर त्यांनी नितीश कुमार आणि एनडीएला मतदान केले तर त्यांना उर्वरित रक्कम मिळेल. केवळ बिहारमध्येच नाही तर देशात इतरत्र कुठेही, मी कधीही कोणत्याही सरकारने ५० हजार महिलांना अशा प्रकारे पैसे वाटताना पाहिले नाही.
दरम्यान, या निवडणुकीत काही अदृश्य शक्ती कार्यरत होत्या. ज्या पक्षांबद्दल लोकांना माहितीही नव्हती, त्यांना लाखो मते मिळाली. लोक मला ईव्हीएमबद्दल तक्रार करण्यास सांगत आहेत. पण माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, अनेक गोष्टी समजण्यासारख्या नाहीत. प्रथमदर्शनी असे दिसते की काहीतरी चूक झाली आहे, पण काय ते मी सांगू शकत नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.