बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:00 IST2025-11-14T16:57:24+5:302025-11-14T17:00:33+5:30
Bihar Assembly Election Result 2025 News & Results Live Updates: बिहारच्या निकालाचे गणित पाहून जेडीयूचे कार्यकर्तेही चक्रावून जातील...

बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
Bihar Assembly Election Result 2025 News & Results Live Updates: बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि चिराग पासवान यांच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. १०१ लढवलेल्या जागांपैकी भाजपने ९५ जागांवर आघाडीवर आहे. २८ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) २१ जागांवर आघाडीवर आहे. तर उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा (Rashtriya Lok Morcha) चार आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थानी आवाम मोर्चा (HAMS) पाच जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. एकूणच, नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारमध्ये या चारही पक्षांनी मिळून १२२ जागांचा आकडा ओलांडला आहे. या चौघांना मिळून अंदाजे १२५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना यावेळी मुख्यमंत्रिपद हुलकावणी देणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
नितीश कुमार अधिकृत उमेदवार नाहीत!
बिहारमध्ये, एनडीएने नितीश कुमार यांना अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या मते, मुख्यमंत्री लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडले जातील. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. नियमानुसार, राज्यपाल प्रथम सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. त्यामुळे भाजपा कदाचित मुख्यमंत्रीपदावर दावा सांगू शकतो, अशा चर्चा सुरू आहेत.
नितीश कुमारांच्या घरी हालचालींना वेग
बिहार निवडणुकीच्या निकालांच्या दरम्यान, नितीश कुमार यांच्या निवासस्थानी हालचाली तीव्र झाल्या आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा आणि मंत्री अशोक चौधरी नितीश यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. संजय झा संपूर्ण प्रकरणात भाजपशी समन्वय साधत आहेत.
नितीश कुमारांना इतरांचीही साथ नाही
यंदाच्या निकालांमध्ये राजद आणि काँग्रेस मागे पडले आहेत. बिहार निवडणुकीत महाआघाडीतील सहा पक्षांना फक्त ३० जागांवर आघाडी असल्याचे दिसून येते. या पक्षांना सोबत घेऊन नितीश कुमार यावेळी मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. २०२०च्या निवडणुकीनंतर, नितीश यांनी २०२२ मध्ये राजदसह जात सत्तास्थापना केली होती. पण यावेळी तो पर्यायही उपलब्ध नाही.