भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:36 IST2025-10-01T11:59:39+5:302025-10-01T12:36:40+5:30
मी मराठी बोलणार नाही, जास्तीत जास्त हे जीव घेतील तर मी शहीद होईन. त्यामुळे मला जीवे मारले तरी मी मराठी बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.

भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
पटना - भोजपुरी सुपरस्टार आणि प्रसिद्ध गायक पवन सिंह यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत पवन सिंह भाजपाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पवन सिंह यांना भाजपात आणण्यात बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडे यांची भूमिका महत्त्वाची राहिली. येत्या काही महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी पवन सिंह यांची भाजपात घरवापसी झाली आहे.
पवन सिंह भाजपा कार्यकर्ते म्हणून एनडीएसाठी आगामी निवडणुकीत सक्रीय प्रचार करतील अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. तावडे यांनी पवन सिंह आणि उपेंद्र कुशवाह यांचीही भेट घडवली. पवन सिंह यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. उपेंद्र कुशवाह हे एनडीएचे घटक पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख आहेत, मग भाजपात प्रवेशाआधी पवन सिंह आणि कुशवाह यांची भेट का घडवावी लागली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र यामागचे कारण २०२४ ची लोकसभा निवडणूक आहे.
२०२४ च्या निवडणुकीत उपेंद्र कुशवाह काराकाट मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यांच्या पराभवासाठी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले पवन सिंह यांना जबाबदार धरले गेले. पवन सिंह यांना उपेंद्र कुशवाहा यांच्याहून अधिक मते मिळाली होती. ते दुसऱ्या नंबरवर होते. पवन सिंह यांच्यामुळे कुशवाह यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अपक्ष उभं राहण्यापूर्वी पवन बिहार भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत होते. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे भाजपाने ६ वर्षासाठी पवन सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि उपेंद्र कुशवाह यांना राज्यसभेत पाठवून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कुशवाह यांची नाराजी न घेता पवन सिंह यांना पुन्हा पक्षात घेण्यात विनोद तावडेंना यश आले.
पवन सिंह जी बिहार विधानसभा चुनाव में एक भाजपा कार्यकर्ता के रूप में सक्रियता से NDA की जीत के लिए काम करेंगे।
— Vinod Tawde (@TawdeVinod) September 30, 2025
आज उन्होंने गृह मंत्री @AmitShah जी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda जी एवं राष्ट्रीय लोक मोर्चा प्रमुख @UpendraKushRLM जी से भेंट कर आशीर्वाद प्राप्त किया। pic.twitter.com/2guNDDqVG5
हिंदी-मराठी वादावर पवन सिंह काय म्हणाले होते?
मुंबईत सुरू असलेल्या हिंदी मराठी वादावर एका मुलाखती पवन सिंह यांनी भाष्य केले होते. त्यात माझा जीव गेला तरी मराठी बोलणार नाही, मी शहीद होईन. मराठी येत नसली तरी मी मुंबईत काम करत आहे आणि यापुढेही करत राहीन. भारतात प्रत्येकाला हिंदी भाषा बोलण्याचा अधिकार आहे. मला मराठी येत नाही, मी बोलणार नाही. माझा जन्म बंगालमध्ये झाला, परंतु बांग्ला येत नाही. मी ती भाषा शिकू शकत नाही. महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी हे कशाला, हा अहंकार आणि घमंड आहे. मी मराठी बोलणार नाही, जास्तीत जास्त हे जीव घेतील तर मी शहीद होईन. त्यामुळे मला जीवे मारले तरी मी मराठी बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.