तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:59 IST2025-11-16T17:58:34+5:302025-11-16T17:59:49+5:30
Bihar Assembly Election 2025 : लालू प्रसाद यादव यांच्यापासून दुरावलेल्या तेजप्रताप यादवांनी निवडणुकीपूर्वी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.

तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील NDA ने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर आता राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजप्रताप यादव यांचा पक्ष जनशक्ति जनता दल (JJD) ने एनडीए सरकारला नैतिक समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लालू यादवांची मुलगी रोहिणी आचार्य यांना पक्षाचा राष्ट्रीय संरक्षक बनवण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात अल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते प्रेम यादव यांनी दिली. तेज प्रताप लवकरच त्यांच्याशी या प्रस्तावावर चर्चा करतील. तेज प्रताप यादव यांनी आधीच जाहीरपणे वडिलांशी असलेले त्यांचे राजकीय आणि कौटुंबिक मतभेद मान्य केले आहेत. याच पार्श्वभूमीवर, तेजप्रताप यांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातोय.
पक्षातून हकालपट्टीनंतर स्वतंत्र पक्षाची स्थापना
लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या तेजप्रताप यांची वडिलांनी काही महिन्यांपूर्वी कुटूंब आणि पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर, त्यांनी जनशक्ती जनता दल नावाचा पक्ष स्थापन केला आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नशीब आजमावले. त्यांनी स्वतःसह 21 उमेदवार उभे केले. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी, सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये त्यांची बरीच चर्चा झाली. राजकीय विश्लेषकांच्या मते, तेजप्रताप आता सरकारला पाठिंबा देऊन स्वतःची ओळख अधिक मजबूत करू इच्छितात.