नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 05:54 IST2025-10-20T05:52:30+5:302025-10-20T05:54:20+5:30
जदयूचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना निवडणुकीनंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेतला जाईल.

नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, जर बिहारमध्ये एनडीएला विजय मिळाला तर मुख्यमंत्री कोण असणार याचा पर्याय खुला आहे. जदयूचे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना निवडणुकीनंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेतला जाईल.
एनडीएमधील तिसरा सर्वांत मोठा मित्रपक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी (रामविलास) यांनी म्हटले आहे की, अमित शाह यांची भूमिका स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री निवडण्यासाठी एनडीएचे सर्व आमदार एकत्र बसतात ही एक सामान्य प्रक्रिया आहे.
नितीशकुमार प्रभावी नेते
जदयूने म्हटले आहे की, नितीशकुमार यांच्या आरोग्याचा मुद्दा असूनही ते बिहारमध्ये एनडीएचा सर्वांत प्रभावी चेहरा आहेत. शनिवारी एका पोस्टमध्ये जदयूचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार यांनी म्हटले आहे की, “सूर्य टरे, चंद्र टरे, टरे सकल संसार, विकास की राह से न टरे नितीश कुमार” . जनतेचा विश्वास नितीशकुमार यांच्यावर आहे. सुशासनाचे प्रतीक, न्यायमित्र आणि एनडीएच्या विकासाच्या अजेंड्याचे नेते म्हणून लोकांचा नितीशकुमार यांच्यावरील विश्वास अढळ आहे.