"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:05 IST2025-10-07T17:04:55+5:302025-10-07T17:05:34+5:30
bihar assembly election 2025 : राजकारणात एकमेकांवर टीका करणे सामान्य गोष्ट आहे, असे सांगत मैथिली म्हणाली...

"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच, लोकसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर केलेल्या 'व्होट चोरी'च्या (Vote Theft) आरोपांसंदर्भात प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, हा मुद्दा असू शकत नाही आणि लोकांकडून एनडीएला (NDA) जबरदस्त पसंती मिळत आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे व्होट चोरीच्या अथवा मत चोरीच्या मुद्द्यावर, प्रसारमाध्यमांशी बोलताना मैथिली म्हणाली, "हा काही मुद्दा आहे, असे मला वाटत नाही. सगळेच लोक अत्यंत आनंदात आहेत. सगळेच एनडीएला पसंत करत आहेत. आमचे मुख्यमंत्री नितीश कुमार अत्यंत लोकप्रिय आहेत, ते लोकांना खूप आवडतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर संपूर्ण जगच प्रशंसा करते."
Jabalpur, Madhya Pradesh: On the allegations of 'vote chori', folk singer Maithili Thakur says, "I don’t think this is an issue at all. Everyone is very happy. People like the NDA. Our Chief Minister Nitish Kumar is very popular. And Prime Minister Modi is admired by the entire… pic.twitter.com/9QnQbKU9VE
— IANS (@ians_india) October 7, 2025
राजकारणात एकमेकांवर टीका करणे सामान्य गोष्ट आहे, असे सांगत मैथिली म्हणाली, "मी तर अजून राजकारणात प्रवेशही केलेला नाही, पण गोष्ट अशी आहे की, लोकांनी एकमेकांवर टीका करणे किंवा एकमेकांबद्दल वाईट बोलणे ही सामान्य गोष्ट आहे." तसेच, "जर कुणी कुणाबद्दल काही चुकीचे बोलत असेल, तर त्यात आश्चर्य वाटायचे कारण नाही." असे परखड मतही तिने यावेळी व्यक्त केले.
243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान -
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख, पहिल्या टप्प्यासाठी १७ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर आहे. याशिवाय, अर्ज पडताळणीची तारीख, पहिल्या टप्प्यासाठी १८ ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी २१ ऑक्टोबर आहे. तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख पहिल्या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी २३ ऑक्टोबर आहे. या निवडणुकीची मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होईल.