महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 06:24 IST2025-10-19T06:23:07+5:302025-10-19T06:24:27+5:30
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत चार असे मतदारसंघ आहेत, जिथे महाआघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत.

महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपली तरी महाआघाडीच्या जागा वाटपाचा घोळ अद्याप संपलेला नाही. जागावाटपात एकमत होत नसल्याने परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की कोण कुठून निवडणूक लढवणार हे ठरवण्यासाठी महाआघाडीला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जागावाटपासंदर्भात कोणतीही घोषणा न करता निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाआघाडीने १२१ जागांसाठी १२५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) ७२, काँग्रेसचे २४, डावे पक्ष २१ व आयआयपीने दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत चार असे मतदारसंघ आहेत, जिथे महाआघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर महाआघाडीचे डझनहून अधिक उमेदवार एकमेकांसमारे उभे राहू शकतात. यात सिकंदरा मतदारसंघातून राजदने विधानसभेचे माजी अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र, याच मतदारसंघात काँग्रेसने विनोद चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. दुसरीकडे कुटुंबा ही काँग्रेसची हॉट सीट असून, पक्षाने येथे प्रदेश अध्यक्ष राजेश राम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, राजदने या मतदारसंघातून सुरेश पासवान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. वैशाली मतदारसंघात काँग्रेसचे संजीव कुमार तर राजदचे अजय कुशवाह यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. लालगंज मतदारसंघात राजदचे शिवानी शुक्ला व काँग्रेसचे आदित्य कुमार राजा यांच्यात सरळ लढत होत आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा स्वतंत्रपणे रिंगणात
रांची : झारखंडमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या ‘झारखंड मुक्ती मोर्चाने जाहीर केले आहे की तो बिहार विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असून सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहे. झामुमोचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी शनिवारी सांगितले की, पक्षाने चकाई, धमदाहा, कटोरिया (आरक्षित), मनिहारी (आरक्षित), जमुई आणि पीरपैंती या सहा मतदारसंघांत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. झामुमोच्या सर्व सहा जागांवर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ११ नोव्हेंबरला मतदान होईल.
सुप्रियो भट्टाचार्य म्हणाले, “पक्षाने बिहारमध्ये कोणत्याही आघाडीशिवाय स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. झामुमो हा सध्या झारखंडमध्ये झारखंडमधील सत्तारूढ आघाडीचा घटक आहे आणि बिहारमध्ये पहिल्यांदाच स्वतंत्रपणे आपला प्रभाव आजमावण्याच्या तयारीत आहे.
अर्ज बाद झाल्याने एनडीएला धक्का
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला मोठा धक्का बसला आहे. लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) हा एनडीएचा घटक पक्ष आहे. या पक्षाने सारण जिल्ह्यातील मढौरा विधानसभा क्षेत्रातून प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री सीमा सिंह हिला उमेदवारी दिली होती. मात्र, कागदपत्रात तांत्रिक चुका आढळून आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. सीमा सिंह यांच्यासोबतच आणखी तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यात बसपाच्या एका तर अपक्ष उमेदवारांचे दोन अर्ज आहेत.
मतदारांना भरपगारी रजा द्या
आगामी महिन्यात दोन टप्प्यांत बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश निवडणूक आयोगाने त्या राज्यातील कंपन्या, उद्योजकांना दिले आहेत. या कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला जाऊ शकतो, असे निवडणूक आयोगाने सांगितले.