बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:27 IST2025-10-21T06:24:27+5:302025-10-21T06:27:59+5:30
कुठे इतर पक्षांच्या नेत्याला उमेदवारी, तर कुठे दोन उमेदवारांना दिले चिन्ह

बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दोन उमेदवारांना तिकिटे दिली आहेत तर काही ठिकाणी सक्षम उमेदवार नसल्याने राजदच्या नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे.
काँग्रेसच्या या तिकीट वाटपाचे वैशिष्ट्य असे की, राजदचा एक नेता आपल्या पक्षाचा राजीनामा न देताच थेट काँग्रेसची उमेदवारी घेत मैदानात उतरला आहे तर, सुपौल मतदारसंघात या पक्षाचे दोन-दोन उमेदवार आहेत. पक्षाने आधी अनुपम यांना तिकीट दिले. परंतु, नंतर वाद झाल्याने मिन्नत रहेमानी यांना उमेदवार घोषित करण्यात आले. आता दोघांनाही पक्षाचे चिन्ह मिळाले आहे. या मतदारसंघात एकीकडे उच्चवर्णीय आणि दुसरीकडे अल्पसंख्यांक उमेदवार असा पेच असल्याने अनुपम यांच्याकडून चिन्ह कसे काढून घेतले जाते हे पाहावे लागेल.
जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
काँग्रेसने सुरुवातीला सुपौलमधून अनुपम यांना तिकीट दिले. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. जून २०२३ मधील या पोस्टमध्ये अनुपम यांनी ‘राहुल गांधी यांनाच राष्ट्रीय आपत्ती का घोषित करू नये?’, असे विधान केल्याचे दिसते.
पोस्ट व्हायरल होताच त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली परंतु चिन्ह तसेच राहिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर स्थिती स्पष्ट होईल.
जालेमध्ये राजकीय वादळ : जाले विधानसभा मतदारसंघात जणू राजकीय वादळ उठले. पंतप्रधानांच्या आईबद्दल अवमानकारक टिप्पणी ज्या कार्यक्रमात करण्यात आली होती तो काँग्रेस नेते मोहम्मद नौशाद यांनी आयोजिला होता.
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण
बिहार विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील १२२ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी समाप्त झाली. यासोबतच पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही संपली आहे. पहिल्या टप्प्यात १,३७५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून ६१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत १,३१४ उमेदवार मैदानात राहिले आहेत.
बिहारमध्ये निवडणूक लढविणार नाही; ‘झामुमो’ची घोषणा
बिहारमधील विधानसभा निवडणुका लढविणार नसल्याचे झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) सोमवारी जाहीर केले. झारखंडमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या झामुमोने आरोप केला की, महागठबंधनातील घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल (राजद) यांनी आमच्या विरोधात रचलेल्या राजकीय कटामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. महागठबंधनातील पक्षांनी झामुमोला डावलण्याचा प्रयत्न केला.
राजद, भाकपसह काँग्रेसने जाहीर केले उमेदवार
काँग्रेसप्रणीत महाआघाडीत जागावाटपावरून काही मुद्द्यांवर मतभेद असतानाच या आघाडीतील प्रमुख राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजदने १४३, तर काँग्रेसने ६० नावांची घोषणा केली आहे. या आघाडीत उपरोक्त पक्षांव्यतिरिक्त भाकप, माकप आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे. २०२० मध्ये राजदने १४४ उमेदवार उभे केले होते. यावेळी आतापर्यंत १४३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. आरजेडीने १४३ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी पेच कायम आहे.