बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 23:10 IST2025-11-27T23:10:00+5:302025-11-27T23:10:57+5:30
...या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एका नेत्याने हातवारे करत 'गोळी मारण्याची' धमकी दिली.

बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसने दिल्लीतील पक्ष मुख्यालय असलेल्या इंदिरा भवनमध्ये गुरुवारी (२७ नोव्हेंबर २०२५) आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एका नेत्याने हातवारे करत 'गोळी मारण्याची' धमकी दिली.
एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वेटिंग रूममध्ये बिहारमधील वैशालीचे नेते इंजिनिअर संजीव आणि पप्पू यादव यांचे निकटवर्तीय उमेदवार जितेंद्र कुमार यांच्यात बाचाबाची झाली. बाहेरच्या लोकांना तिकीट दिले जाते, असे म्हणत संजीव यांनी हातवारे करत गोळी मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना देण्यात आली आहे.
इंजिनिअर संजीव म्हणाले... -
इंजिनिअर संजीव यांनी मात्र वादाच्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, 'मी कोणाला जीवे मारण्याची धमकी दिली, अशा बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. माझा कोणाशीही वाद झालेला नाही. काही उमेदवार आपली बाजू मांडण्यासाठी आले होते, त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. कोणताही वाद किंवा गोळी चालवण्याबद्दलची चर्चा झाली नाही. या अफवांवर लक्ष देऊ नये.'
केसी वेणुगोपाल काय म्हणाले? -
बैठकीसंदर्भात बोलताना काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी आमदारांकडून तसेच पराभूत उमेदवारांकडून १० च्या समूहाने फीडबॅक घेतला. या बैठकीला बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम, कृष्णा अल्लावरू, तारिक अन्वर, पप्पू यादव आणि कन्हैया कुमार हे देखील उपस्थित होते.