मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 20:06 IST2025-11-20T20:05:14+5:302025-11-20T20:06:58+5:30
टोल प्लाझा परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
पंजाबमधील लुधियाना येथे पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाडोवाल टोल प्लाझा नजीक मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकाला काही संशयित दहशतवादी लाडोवाल टोल प्लाझाजवळ असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, परंतु पोलिसांनी घेरलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त स्वप्न शर्मा यांनी तातडीने अतिरिक्त पोलीस कुमक आणि विशेष सुरक्षा पथके घटनास्थळी रवाना केली आहेत.
टोल प्लाझा परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, वाहतूक थांबवण्यात आली आहे. या दहशतवाद्यांचा नेमका उद्देश काय होता आणि त्यांनी शहरात मोठा घातपात करण्याचा कट रचला होता का, या दिशेने तपास सुरू आहे. गोळीबार थांबला आहे की दहशतवादी अद्यापही लपून बसले आहेत, याबाबत अधिकृत माहिती येणे बाकी आहे. पोलिसांकडून संपूर्ण परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे.
दोन दहशतवाद्यांना गोळी लागल्याचे समजते आहे. यापैकी एक गंभीर आहे. तर दुसऱ्याचा मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना आधीच अटक करण्यात आली आहे.