हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:37 IST2025-10-03T12:36:42+5:302025-10-03T12:37:14+5:30
कफ सिरपमुळे एका २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

फोटो - आजतक
राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषध योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमुळे वाद निर्माण झाला आहे. सीकर आणि भरतपूरमध्ये मुलांची प्रकृती बिघडल्याची प्रकरणे आधीच नोंदवली गेली आहेत. याच दरम्यान भरतपूर जिल्ह्यातील वैरा भागात धक्कादायक घटना घडली आहे. कफ सिरपमुळे एका २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
लुहासा गावात ही घटना घडली. मुलाचे वडील निहाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा थान सिंग (५ वर्षांचा) आणि छोटा मुलगा तीर्थराज (२ वर्षांचा). २३ सप्टेंबर रोजी दोन्ही मुलांना खोकला आणि सर्दी झाली आणि त्यांना वैरा सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. डॉ. बबलू मुदगल यांनी इतर औषधांसह कफ सिरप दिलं.
कुटुंबाने मुलांना घरी आणलं आणि छोट्या मुलाला तीर्थराजला कफ सिरप दिलं. सिरप प्यायल्यानंतर मुलाला झोप लागली पण चार तासांपर्यंत तो शुद्धीवर आला नाही. मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला वैरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर भरतपूर रुग्णालयात रेफर करण्यात आलं. जेव्हा त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही तेव्हा त्याला २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी जयपूरच्या जेके लोन रुग्णालयात पाठवण्यात आलं, जिथे २७ सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
वैरा सामुदायिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. बीपी शर्मा यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितलं की मुलाला अँटीबायोटिक गोळ्या आणि कफ सिरप देण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनंतर, या सिरपचे वितरण थांबवण्यात आलं आहे आणि चौकशी सुरू आहे. कुटुंबाचा आरोप आहे की सिरप दिल्यानंतर मुलाची प्रकृती बिघडली. त्यांनी सांगितलं की, राज्यात कफ सिरपमुळे होणाऱ्या आजारांची आणि मृत्यूची बातमी समोर आली तेव्हाच त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी देखील सिरपच कारणीभूत असल्याचं लक्षात आलं.