"देवी, बायकोपासून माझी सुटका कर"; नवस पूर्ण होताच नवऱ्याने केलं 'असं' काही, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:07 IST2026-03-30T11:06:16+5:302026-03-30T11:07:19+5:30
एक पती आपल्या पत्नीमुळे इतका त्रस्त झाला की, त्याने देवाकडे एकत्र राहण्यासाठी नव्हे, तर पत्नीपासून सुटका व्हावी म्हणून नवस केला. जेव्हा हा नवस पूर्ण झाला, तेव्हा जे घडले त्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे.

फोटो - tv9hindi
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने वैवाहिक सुखाची व्याख्याच बदलून टाकली आहे. एक पती आपल्या पत्नीमुळे इतका त्रस्त झाला की, त्याने देवाकडे एकत्र राहण्यासाठी नव्हे, तर पत्नीपासून सुटका व्हावी म्हणून नवस केला. जेव्हा हा नवस पूर्ण झाला, तेव्हा जे घडले त्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे.
सोनहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. येथील एका तरुणाचं वैवाहिक जीवनात लग्नानंतर अवघ्या २ वर्षांतच वादळ आलं, सतत भांडण होऊ लागलं. आपापसातील वाद आणि मानसिक तणावामुळे कंटाळलेल्या पतीने देवीच्या दरबारात साकडं घातलं. तरुणाने देवीकडे नवस केला की, जर त्याची पत्नीपासून सुटका झाली, तर तो घरापासून मंदिरापर्यंत दंडवत यात्रा करेल.
जेव्हा कायदेशीर किंवा सामाजिकदृष्ट्या पत्नीपासून त्याची सुटका झाली, तेव्हा तरुणाने आपला नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सकाळी अन्न-पाण्याचा त्याग करून, पत्नीमुळे त्रस्त असलेल्या या पतीने आपल्या गावापासून भानपूर येथील देवीच्या मंदिरापर्यंत ९ किलोमीटर लांब यात्रा केली. तरुण दंडवत घालत मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे, या यात्रेत तो एकटा नव्हता. त्याचे आई-वडील आणि गावातील अनेक लोक वाजत-गाजत आणि देवीचा जयघोष करत त्याच्या मागे चालत होते. समाजात जिथे नाती तुटल्यावर शोक व्यक्त केला जातो, तिथे एक नातं तुटल्याच्या आनंदात भक्तीचा पूर ओसंडून वाहत होता.
संध्याकाळी ६ वाजता जेव्हा तो रक्ताळलेले गुडघे आणि थकलेल्या शरीरासह मंदिरात पोहोचला, तेव्हा त्याने देवीचे दर्शन घेतलं आणि कृतज्ञता व्यक्त केली. तरुणाच्या चेहऱ्यावर शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक शांततेची चमक जास्त होती. त्याने प्रसारमाध्यमं आणि स्थानिक लोकांशी बोलताना केवळ इतकाच संकेत दिला की, वैवाहिक जीवनाच्या नरकातून बाहेर पडल्यामुळे आता त्याला शांतता वाटत आहे. पीडित पतीने सांगितलं की, तो आपल्या पत्नीच्या त्रासामुळे कंटाळला होता, ज्यातून सुटका मिळवण्यासाठी त्याने न्यायालयात दाद मागितली होती. दोन वर्षे खटला चालल्यानंतर अखेर त्याचा घटस्फोट झाला आहे. या निर्णयामुळे तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे.