काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:32 IST2025-11-04T08:31:51+5:302025-11-04T08:32:55+5:30
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील देवा-फतेहपूर रस्त्यावर बिशुनपूर शहराजवळ सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला.

फोटो - ndtv.in
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील देवा-फतेहपूर रस्त्यावर बिशुनपूर शहराजवळ सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. वेगाने येणारा ट्रक आणि अर्टिगाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. सोमवारी जयपूर आणि हैदराबादमध्ये असाच भीषण अपघात झाला. जयपूर अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर हैदराबाद अपघातात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रक आणि अर्टिगाची धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. मृतांमध्ये चालक श्रीकांत शुक्ला, प्रदीप सोनी, त्यांची पत्नी माधुरी सोनी आणि त्यांचा मुलगा नितीन यांचा समावेश आहे. कारमधील ८ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
#WATCH | बाराबंकी, उत्तर प्रदेश: बाराबंकी SP अर्पित विजयवर्गीय ने बताया, "रात करीब 10 बजे देवा थाना क्षेत्र के तहत देवा-फतेहपुर मार्ग पर एक आर्टिका कार और ट्रक की टक्कर हो गई। आर्टिका में सवार 8 लोग गंभीर रूप से घायल हुए, जिनमें से 6 लोगों की मौत हो गई, जिनमें 5 पुरुष और 1 महिला… https://t.co/ISHrjCTgwnpic.twitter.com/NkIz3Oheoz
— ANI_HindiNews (@AHindinews) November 4, 2025
कारमध्ये असलेले लोक कानपूरमधील बिठूर येथील गंगेत पवित्र स्नान करून परत येत असताना हा अपघात झाला. माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी आणि पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढलं आणि रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवलं. त्यांची गंभीर प्रकृती पाहून सर्व जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात हा अपघात वेगामुळे झाल्याचं दिसून येतं. सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या साहाय्याने वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अवधेश कुमार यादव यांनी सांगितलं की, जखमींना स्थानिक सीएचसीमधून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना उपचारासाठी लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं.