'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:09 IST2025-10-10T18:08:33+5:302025-10-10T18:09:43+5:30
Donald Trump Bagram Air Base Afghanistan: बराच काळ अमेरिकेच्या ताब्यात बगराम हवाई तळ होता. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अमेरिकेने हा हवाई तळ सोडला. पण आता पुन्हा ट्रम्प यांनी याची मागणी केली आहे.

'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
Bagram Air Base News: अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळावर पुन्हा अमेरिकेची नजर गेली आहे. तालिबानने सत्ता काबीज गेल्यानंतर अमेरिकेने तळ सोडला. पण, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा हा तळ मागितला आहे. याबद्दल जेव्हा भारत दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी अमेरिकेला हा तळ देणार नसल्याचे सांगत ट्रम्प यांची मागणी धुडकावून लावली. 'अफगाणिस्तानच्या भूमीवर दुसऱ्या देशाचा लष्करी वेशातील माणूसही आम्हाला नकोय', असे म्हणाले.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानचा बगराम हवाई तळावर दावा करत धमकी दिली आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
लष्करी वेशातील माणूसही आमच्या भूमीवर नको
अफगाणिस्ताननचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, "इतिहासात डोकावलं तर अफगाणिस्तानच्या जनतेने परदेशातील लष्कर कधीही स्वीकारले नाही. आणि आम्हीही ते स्वीकारणार नाही. आम्ही मुक्त आणि अभिमानी देश आहोत. जर तुम्हाला (अमेरिकेला) आमच्या सोबत संबंध कायम ठेवायचे असतील, तर राजनैतिक मार्गानेच ते ठेवावे लॉगतील. पण, लष्करी वेशातील माणूसही आमच्या भूमीवर आम्हाला नकोय", असा इशारा त्यांनी दिला.
पाकिस्तानलाही सज्जड दम
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांनी भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानलाही सज्जड दम दिला. "आमचे सरकार प्रादेशिक स्थिरता आणण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही सुरक्षा सहकार्य करण्यावर विस्तृत चर्चा केली आहे. आम्ही अफगाणिस्तानच्या भूमिचा वापर कोणत्याही देशाविरोधात करू देणार नाही", असे ते म्हणाले.
"आपल्या सीमेतून दुसऱ्या देशात केल्या जाणाऱ्या कारवाई थांबवल्या पाहिजेत. अशा प्रकारची रणनीतीने कोणताही प्रश्न सुटू शकत नाही. अफगाणिस्तानी जनतेच्या संयम आणि शौर्याला आव्हान देऊ नये. जर याबद्दल कुणाला शंका असेल, तर त्यांनी ब्रिटन, सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेला विचारावं", असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दिला.