अयातुल्ला अली खामेंनीचा इराणमध्ये मृत्यू; पण, भारतातील ‘या’ गावावर शोककळा; होते खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 20:08 IST2026-03-01T20:07:30+5:302026-03-01T20:08:57+5:30
Ayatollah Ali Khamenei: खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे समजताच भारतातील उत्तर प्रदेशमधील एका छोट्या गावात शोककळा पसरल्याचे म्हटले जात आहे. खामेनी यांचे नेमके काय आणि कसे कनेक्शन होते?

अयातुल्ला अली खामेंनीचा इराणमध्ये मृत्यू; पण, भारतातील ‘या’ गावावर शोककळा; होते खास कनेक्शन
Ayatollah Ali Khamenei: अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये २०० पेक्षा अधिक जण ठार झाले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. अद्यापही अनेक ठिकाणी हल्ले सुरूच आहेत. मध्य पूर्वेतील देशांमधील तणाव वाढताना पाहायला मिळत आहे. इराण अमेरिकेचे तळ असणाऱ्या अन्य देशातील ठिकाणी मोठे हल्ले चढवत आहे, तर इस्रायल तेहरानमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आणि धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भारतातील उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या एका गावावर या बातमीने शोककळा पसरल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी झालेल्या हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात अवघ्या ३० सेकंदांत इराणमधील ३ महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सुमारे ३० वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कारवाईत ‘३०’ हा आकडा वारंवार समोर येत आहे. ३० सेकंद, ३० ठिकाणे, ३० नेते अन् ३० बॉम्ब. काही रिपोर्ट्सनुसार, खामेनी यांच्या ठिकाणावर सुमारे ३० शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. यानंतर खामेनी यांच्या मृत्यूचे वृत्त जगभर पसरले.
खामेनी यांचे उत्तर प्रदेशातील गावाशी होते खास कनेक्शन
अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूच्या बातमीने उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर गावात शोककळा पसरली. खामेनींचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी यांचे मूळ या गावाशी संबंधित असल्याची माहिती आहे. बाराबंकीच्या सिरौली गौसपूर तहसीलमधील किंतूर गावाचा खामेनी कुटुंबाशी ऐतिहासिक संबंध असल्याचं सांगितलं जातं. अयातुल्ला खामेनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी हे १८-१९व्या शतकात याच गावात राहत होते, अशी माहिती स्थानिकांकडून दिली जाते. स्थानिकांच्या मते, सय्यद अहमद मुसावी हिंदी यांनी आपल्या नावामागे ‘हिंदी’ हा शब्द जोडून मूळ भारतीय ओळख जपली होती. या गावात आजही काही जुनी कागदपत्रे आणि परंपरागत वास्तूंच्या आठवणी या ऐतिहासिक नात्याची साक्ष देतात, असे सांगितले जाते.
दरम्यान, स्थानिक रहिवासी भावुक होत ही घटना केवळ इराणची नाही तर संपूर्ण जगाची हानी असल्याचे म्हटले असून, ही मोठी दुःखद घटना असल्याचीही भावना व्यक्त केली. अनेक ग्रामस्थांनी या घटनेला 'इतिहासातील वेदनादायक क्षण' असं संबोधले आहे. गावातील नागरिक एकत्र येऊन जुन्या आठवणी आणि या ऐतिहासिक नात्याविषयी चर्चा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद या छोट्या गावातही स्पष्टपणे उमटत आहेत.