पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 00:02 IST2025-05-11T00:01:29+5:302025-05-11T00:02:00+5:30
India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर भारताविरोधात दशतवाद पसरवण्यासाठी करत राहील तोपर्यंत, कायमस्वरूपी शांतता शक्य नाही, युद्धबंदी होवो वा न होवो पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच राहिली पाहिजे.
यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी लष्कर आणि सरकारला पाठिंबा जाहीर करताना बाह्य आक्रमणाविरोधात मी नेहमीच सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा देईन असे सांगितले. तसेच यावेळी युद्धबंदीवरून सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी एका परराष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा का केली,? सिमला करारानंतर भारत नेहमीच द्विराष्ट्रीय संबंधांमध्ये तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला नाकारत आला आहे. आता आपण ही बाब स्वीकारली आहे का? काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयीकरण होणार नाही, कारण हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी मला अपेक्षा आहे
- आपण तटस्थ ठिकाणी चर्चेचा प्रस्ताव का मान्य केला? या चर्चेचा अजेंडा काय असेल, पाकिस्तान भविष्यात आपल्या भूमीवर दहशतवादाला खतपाणी घालणार नाही, याची हमी देणार का?
- आपण पाकिस्तानला भविष्यात दहशतवादी हल्ले करण्यापासून रोखण्याच्या आपल्या उद्देशात यशस्वी झालो आहोत का? युद्धबंदीचा हा केवळ एकमेव उद्देश होता का?
-पाकिस्तानला FATEच्या ग्रे यादीत टाकण्यासाठीची आपली आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू राहिली पाहिजे