आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:42 IST2025-10-03T16:40:32+5:302025-10-03T16:42:21+5:30
Andhra Pradesh Banni Festival Incident: पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
Andhra Pradesh Banni Festival Incident: आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात विजयादशमी निमित्त साजरा होणाऱ्या पारंपारिक देवरगट्टू बन्नी उत्सवाला देशभरात एक विशेष स्थान मिळाले आहे, याला माला मल्लेश्वर स्वामी उत्सव म्हणून ओळखले जाते. या उत्सवांतर्गत दोन गटांमध्ये लाठी-काठी स्पर्धा आयोजित केली जाते. याच स्पर्धेत सहभागी झालेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल ९० जण जखमी झाले आहेत. जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले असून, पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
हा बन्नी उत्सव माला मल्लेश्वर स्वामींच्या लग्नानंतर मध्यरात्रीच्या विधींनी सुरू होतो. यामध्ये आसपासच्या भागातील हजारो ग्रामस्थ सहभागी होतात. सहभागी लोक उपवास, ब्रह्मचर्य आणि आहाराच्या कठोर शिस्तीचे पालन करतात. महत्त्वाचे म्हणजे, मंदिरातील मूर्तीवर प्रतीकात्मक अधिकार स्थापित करण्यासाठी दोन गटांमध्ये पारंपारिक लाठी-काठी स्पर्धा आयोजित केली जाते.
उपविभागीय दंडाधिकारी मौर्य भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयादशमी निमित्त देवरगट्टू बन्नी उत्सवात आयोजित करण्यात आलेल्या लाठी-काठी स्पर्धेत एका व्यक्तीचा डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर, ९० जण जखमी झाले. जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, "मागील वर्षांच्या तुलनेत यंदा कमी लोक जखमी झाले आहेत."