बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:39 IST2025-10-20T19:37:08+5:302025-10-20T19:39:08+5:30
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. एकीकडे महाआघाडीमधील जागावाटपाचा घोळ अजूनही कायम असल्याने आरजेडी आणि काँग्रेसमध्ये खटके उडत आहेत.

बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप
बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. एकीकडे महाआघाडीमधील जागावाटपाचा घोळ अजूनही कायम असल्याने आरजेडी आणि काँग्रेसमध्ये खटके उडत आहेत. तर दुसरीकडे महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने या आघाडीला मोठा दक्का दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने आरजेडी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप करत निवडणुकीतून माघार घेण्याची निर्णय जाहीर केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. मात्र महाआघाडीला मित्रपक्षांसोबतचा जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत सोडवता आला नाही. त्यामुळे या आघाडीतील एक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती आणि आघाडीमध्ये अंतर्गत समन्वयाचा अभाव असल्याने आम्हाला संवाद साधण्यासाठी पुढे यावे लागले आहे. आमच्यासोबत राजकीय चाली खेळल्या गेल्या. त्यामुळे आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे झारखंड मुक्ती मोर्चातर्फे सांगण्यात आले.
महाआघाडीवर नाराज असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने आता आपण बिहार विधानसभा निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाची मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर महाआघाडीमध्ये आमचा सन्मान आणि भागीदारी यावर लक्ष दिलं गेलं असतं. तर आज परिस्थिी वेगळी असती. आता आम्ही सोबत नसल्याचे परिणाम महाआघाडीला भोगावे लागतील, असा इशाराही झारखंड मुक्ती मोर्चाने दिला आहे.