प्रेयसीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप; तुरुंगातून अभ्यास केला अन् बनला युनिव्हर्सिटी टॉपर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 14:10 IST2023-12-31T14:09:30+5:302023-12-31T14:10:46+5:30
आंध्र प्रदेशातील कडप्पा तुरुंगातील कैद्याने विद्यापीठात पहिला येऊन सुवर्णपदक पटकावले.

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप; तुरुंगातून अभ्यास केला अन् बनला युनिव्हर्सिटी टॉपर
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील संजमाला (नंद्याल) येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील कडप्पा मध्यवर्ती कारागृहात कैद असलेल्या एका कैद्याने तुरुंगात राहून पोस्ट ग्रॅजुएशनचा अभ्यास केला आणि विद्यापीठात पहिला येऊन सुवर्णपदकही पटकावले. विशेष म्हणजे, या कैद्याला न्यायालयाने प्रेयसीच्या हत्येप्रकरणी 2019 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा तेव्हापासून कडप्पा कारागृहात कैद आहे.
कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफी असे या कैद्याचे नाव असून, तो पेरुसिमुला गावातील दुडेकुला नदीप माबुसा आणि दुडेकुला माबुनी यांचा मुलगा आहे. त्याचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला आणि रागाच्या भरात रफीने तिच्या डोक्यावर वार केला. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
2014 मध्ये B.Tech केले
कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रफी सुरुवातीपासूनच हुशार होता. 2014 मध्ये त्याने बी.टेक परीक्षा उत्तीर्ण केली होती. 2019 मध्ये तुरुंगात असताना त्याने अभ्यासात रस दाखवला, कारागृह प्रशासनानेही त्याला संधी दिली. यानंतर रफीने तुरुंगातून 2020 मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळवला. त्याने समाजशास्त्र विषयात एमएचे शिक्षण घेतले आणि संपूर्ण विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झाला. यानंतर कारागृहाने पदवी आणि सुवर्णपदक घेण्यासाठी रफीला जामीन मंजूर केला. रफीचे हे यश इतर कैद्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे.