Andhra Pradesh Accident: नवीन वर्षाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं; कार घेऊन समुद्रकिनारी गेलेल्या तरुणांसोबत घडलं भयंकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:36 IST2026-01-01T17:34:52+5:302026-01-01T17:36:03+5:30
Andhra Pradesh Antarvedi Beach Accident: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या तरुणांसोबत भयंकर घटना घडली.

Andhra Pradesh Accident: नवीन वर्षाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं; कार घेऊन समुद्रकिनारी गेलेल्या तरुणांसोबत घडलं भयंकर!
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या तरुणांसोबत भयंकर घटना घडली. आंध्र प्रदेशातील डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यात कार नदीत कोसळली. या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून एका तरुणाने चालत्या गाडीतून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. तर, एक तरुण अजूनही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.
काकीनाडा येथून निम्मकयला श्रीधर, साई नाथ आणि गोपीकृष्ण हे तीन मित्र नवीन वर्ष साजरा करण्यासाठी अंतरवेदी येथे गेले. त्यांनी समुद्रकिनाऱ्याजवळील एका रेस्टॉरंटमध्ये रूम बुक केली. मध्यरात्री नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केल्यानंतर, तिघेही त्यांच्या थार कारमधून फिरण्यासाठी बाहेर पडले.परंतु, पहाटेच्या सुमारास अण्णा-चेल्ला गट्टूजवळील एका तीक्ष्ण वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काळोख असल्याने वळणाचा अंदाज आला नाही आणि कार थेट गोदावरी नदीच्या पात्रात कोसळली.
गाडी नदीत कोसळत असल्याचे लक्षात येताच गोपीकृष्ण याने प्रसंगावधान राखून चालत्या वाहनातून बाहेर उडी मारली, ज्यामुळे तो थोडक्यात बचावला. मात्र, निम्मकयला श्रीधर हा गाडीसह नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. तिसऱ्या मित्राचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचे आणि बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अंतरवेदी परिसरात आणि मृतांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.