मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 09:13 IST2025-11-02T09:12:17+5:302025-11-02T09:13:09+5:30
"खर्गें यांची काय इच्छा आहे, हे मला माहीत आहे. पण ती कधीही पूर्ण होणार नाही.”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अर्थात आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले, “आरएसएसने देशाला दोन अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान दिले आहेत. आरएसएस एक असे संघटन आहे ज्याने माझ्यासारख्या लाखो तरुणांना देशहितासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी देशभक्ती आणि शिस्तीचे मूल्य रुजवले.” तसेच, 'त्यांनी (खर्गे) बंदीची मागणी केली, पण त्यासाठी कोणतेही कारण दिले नाही,' असेही शाह म्हणाले.
अमित शाह पुढे म्हणाले, “आरएसएसमधून आलेले दोन व्यक्ती या देशाचे पंतप्रधान झाल (अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी). या दोघांनाही देशाचे सर्वोत्तम पंतप्रधान मानले जाईल. देशाच्या विकासात आणि समाजाला योग्य दिशा देण्यात आरएसएसचे योगदान मोठे आहे. खर्गें यांची काय इच्छा आहे, हे मला माहीत आहे. पण ती कधीही पूर्ण होणार नाही.”
काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खर्गे -
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना, “जर मोदी खरंच भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा सन्मान करत असतील, तर त्यांनी आरएसएसवर बंदी घालावी,” असे म्हटले होते. एढेच नाही तर, “देशातील सर्व चुकांची आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सर्व समस्यांसाठी भाजप आणि आरएसएस जबाबदार आहे,” असा आरोपही खर्गे यांनी केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमावेली काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर खर्गे यांनी हे विधान केले होते. काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा योग्यरित्या पुढे न नेल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.