Amit Shah Retirement Plan: भारतात राजकारण्यांसाठी निवृत्तीचे वय ठरलेले नाही. काहीजण लवकर निवृत्त होतात, तर काहीजण वयाच्या शेवटपर्यंत राजकारणात सक्रीय राहतात. दरम्यान, भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. निवृत्तीनंतर काय करणार, याबाबत शाहांनी महत्वाची माहिती दिली.
अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, 'मी निवृत्त झाल्यावर आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. तसेच, निवृत्तीनंतर मी माझे आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवीन. नैसर्गिक शेती, हा एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग आहे, जो अनेक प्रकारचे फायदे देतो.' फार कमी लोकांना माहिती असेल की, अमित शाह अजूनही त्यांच्या जमिनीवर नैसर्गिक शेती करतात.
शाह पुढे म्हणाले की, रासायनिक खते टाकलेला गहू खाल्ल्याने कर्करोग होतो, बीपी वाढतो, थायरॉईडची समस्या उद्भवते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या पिकवलेले अन्न खाणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादन देखील वाढते. मी माझ्या शेतात नैसर्गिक शेती करतो. आज माझे धान्य उत्पादन जवळजवळ 1.5 पट वाढले आहे. शाहांनी आज गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकार क्षेत्राशी संबंधित माता-भगिनी आणि इतर सहकारी कामगारांसोबत 'सहकार संवाद' आयोजित केला होता. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.