Amit Shah on Dr. Babasaheb Ambedkar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे देशातील राजकारण तापले आहे. मंगळवारी (17 डिसेंबर 2024) राज्यसभेला संबोधित शाहांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बाबासाहेबांचे नाव घेतल्यामुळे, आता विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अमित शाहांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. पण, अमित शाहा बाबासाहेबांबद्दल नेमकं काय म्हणाले? पाहा...
पीआयबी फॅक्ट चेकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अमित शाहांच्या भाषणाची क्लिप आणि संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. छोट्या क्लिपमध्ये अमित शाह म्हणता, 'आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर...आता त्यांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे. इतकं देवाचं नाव घेतले असते, सात जन्म स्वर्ग मिळाला असता.' पण, हा अपूर्ण व्हिडिओ आहे. पीआयबीने या व्हिडिओसोबतच अमित शाहांचे पूर्ण वक्तव्य असलेला व्हिडिओही शेअर केला आहे.
पूर्ण व्हिडिओमध्ये अमित शाह म्हणतात, 'तुम्ही आंबेडकरांचे नाव घेता, याचा आम्हाला आनंद आहे. 100 वेळा आंबेडकरांचे नाव घ्या, पण त्याचवेळी आंबेडकरांबद्दल तुमची भावना काय आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला? अनुसूचित जाती आणि जमातींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल मी असमाधानी असल्याचे आंबेडकरांनी अनेकदा सांगितले. मी सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी असहमत आहे आणि कलम 370 शी असहमत आहे, त्यामुळे मला मंत्रिमंडळ सोडायचे आहे, असे त्यांनी काँग्रेससमोर सांगितले होते.
अमित शहा पुढे म्हणाले, 'बी. सी. रॉय यांनी पत्र लिहिले होते की, बाबासाहेब आंबेडकर आणि राजा जी सारख्या दोन महान व्यक्तींनी मंत्रिमंडळ सोडले, तर काय होईल? याला उत्तर म्हणून नेहरुंनी लिहिले, राजाजींच्या जाण्याने थोडे नुकसान होईल, आंबेडकरांच्या जाण्याने मंत्रिमंडळ कमकुवत होणार नाही. मल्लिकार्जुन खरगेजी मतांसाठी तुम्ही त्यांचे नाव घेता, हे योग्य आहे का? आआता आंबेडकरांना मानणारे आले आहेत, त्यामुळेच तुम्ही आंबेडकर, आंबेडकर म्हणत आहात.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अमित शाहांचा पूर्ण व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे:-
'मुंबईच्या महापौरांनी मऊ येथे आंबेडकरांचे स्मारक बांधावे, असे पत्र लिहिले होते. पण, तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. काँग्रेसने आंबेडकरांचे एकही स्मारक देशात बांधलेले नाही. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यावर आंबेडकरांचे स्मारक मऊ येथे बांधण्यात आले. लंडनमध्ये त्यांनी शिक्षण घेतले, त्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले, नागपुरात त्यांनी शिक्षण घेतले, त्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले, दिल्लीतील महापरिनिर्वाणाच्या ठिकाणी स्मारक बांधले, मुंबईतील चैत्यभूमी येथेही स्मारक बांधले जात आहे. आम्ही पंचतीर्थ निर्माण केले आहेत. आम्ही 14 एप्रिल हा राष्ट्रीय सद्भाव दिन म्हणून घोषित केला आहे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित केला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तर याला विरोध केला होता, असेही शाह म्हणाले.