बिहारमध्ये प्रचाराचे रण तापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:43 IST2025-10-30T12:42:01+5:302025-10-30T12:43:14+5:30
अमित शाह : मुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त नाही, गायक मैथिली ठाकूरसाठी घेतली सभा; राहुल गांधी : मेड इन बिहार असे लिहिलेले मला पाहायचे, तेजस्वी यादवांसाठी घेतली सभा

बिहारमध्ये प्रचाराचे रण तापले
दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण असेल? नितीश कुमार या पदावर राहतील की नवीन चेहरा असेल, विरोधक हा एक प्रमुख मुद्दा बनवत आहेत. तथापि, बुधवारी दरभंगा येथील एका जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की, बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त नाही.
ते म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा सोनिया गांधी व्यक्त करतात आणि लालू प्रसाद यादव त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा करतात. पण, मी दोघांनाही सांगतो, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही. येथे नितीश कुमार आहेत आणि तेथे मोदी आहेत. तुमच्यासाठी कोणतीही जागा रिक्त नाही.
सीतामातेच्या पवित्र भूमीला वंदन करतो, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. मैथिली ठाकूर ही मिथिलाचा सन्मान आहे. जनतेला सत्य माहीत आहे. यावेळी मिथिलाची कन्या जिंकेल. भाजप सरकारने मैथिलीचा समावेश संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये केला आहे आणि संविधानाचे मैथिलीमध्ये भाषांतर केले आहे, असेही शाह म्हणाले.
बिहारमध्ये बंडखोरीचे पीक
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडीने प्रचारात आपली पूर्ण ताकद लावली असताना, बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक असंतुष्ट नेत्यांना शांत केले आहे.
भाजपने बहादुरगंजमधील वरुण सिंह, गोपाळगंजमधील अनुप कुमार श्रीवास्तव, कहलगावमधील आ. पवन यादव, बरहराचे सूर्य भान सिंह यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.
राजदने २७ बंडखोरांना पक्षातून काढून टाकले आहे. आ. छोटे लाल राय हे जदयूच्या तिकिटावर परसा येथून निवडणूक लढवत आहेत, तर इतर तीन नेते भाजपमध्ये गेले आहेत. हम पक्षाने पक्ष आणि एनडीए उमेदवारांविरुद्ध काम केल्याबद्दल ११ नेत्यांना काढून टाकले आहे.
तेजस्वी सत्तेत आल्यास सर्व घटकांचे हित जपणार
माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव १ यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. ते सरकार जाती आणि धार्मिक सीमा ओलांडून समाजातील सर्व घटकांचे हित जपणारे असेल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे २ उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासोबत मुझफ्फरपूर आणि दरभंगा येथे सलग दोन संयुक्त सभा घेऊन बुधवारी निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना राहुल म्हणाले की, तुम्ही जे कपडे घालता त्यावर मेड इन चायना, ऐवजी मेड इन बिहार असे लिहिलेले मला पाहायचे आहे. तेजस्वी यादव यांचे सरकार आल्यास हे शक्य होईल.
प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करू : तेजस्वी
पाटणा : इंडिया आघाडीचा जाहीरनाम्यात केवळ घोषणा नाहीत, तर तो आमचा संकल्प व कटिबद्धता आहे. त्यामुळे राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली जाईल, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते व इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी केला. पाटणा येथे माध्यमांशी बोलताना जाहीरनाम्याची काटेकोरपणे अंमलबजाणी केली जाणार असल्याचे तेजस्वी यांनी बुधवारी स्पष्ट केले. हा केवळ आमचा जाहीरनामा नाही तर संकल्पपत्र असल्याचे तेजस्वी म्हणाले. त्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू असे सांगत राज्यातील सत्ताधारी एनडीएचा जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध झाला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भाजपवर टीका केली.